ऋग्वेद आणि मुद्गल पुराणामध्ये गणपतीचे पहिले नाव ब्रह्मणस्पती आहे. ब्रह्म म्हणजे सारे देव आणि त्यांचा अधिपती असलेला गणपती म्हणून ब्रह्मणस्पती. या ब्रह्मणस्पतीचे गाणपत्य शैलीतील मंदिर साकारणे हे खरं तर, माझ्यासाठी शिवधनुष्य पेलण्याइतके कठीण होते. पण, गणरायाच्या कृपाशीर्वादाने हे घडले. नव्हे गणपतीनेच ते माझ्याकडून करून घेतले.. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने साकारलेल्या ब्रह्मणस्पती मंदिराच्या जडणघडणीची सहा महिन्यांपासून सुरू असलेली प्रक्रिया उलगडली.

शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करीत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये साकारलेले ब्रह्मणस्पती मंदिर हे भव्य-दिव्यता आणि त्यावरील नयनरम्य विद्युत रोषणाईमुळे गणेशभक्तांच्या चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, ऋग्वेद आणि मुद्गल पुराणामध्ये वर्णन केल्यानुसार हे मंदिर आकाराला येण्याची प्रक्रिया प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या मनात सहा महिन्यांपासून सुरू होती. जणू, गेले सहा महिने ब्रह्मणस्पती मंदिर हाच त्यांचा श्वास आणि ध्यास झाला होता. या मंदिराच्या स्थापत्य शैलीविषयी डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत प्रधान यांनी आणि अध्यात्मामध्ये नेमके काय सांगितले आहे या विषयी गाणपत्य स्वानंद पुंड यांनी त्यांना मार्गदर्शन केले. या मंदिराची सजावट आणि गाणपत्य शैलीतील कोरीवकामाविषयी खटावकर यांनी डेक्कन कॉलेजमधील ग्रंथालयात जाऊन मंदिराच्या स्थापत्य शैलीची पुस्तके वाचली आहेत.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
surya grahan 2024 negative impact of solar eclipse on these three zodiac sign read more
५४ वर्षांनंतर सूर्यग्रहणात तयार होणार दुर्मीळ योग, ‘या’ तीन राशींच्या अडचणी वाढणार?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

आपल्याकडे नागर, द्रविड आणि वेसर शैलीची मंदिरे आहेत. मात्र, गाणपत्य शैलीचे मंदिर कसे असावे या विषयी नेमकेपणाने माहिती उपलब्ध नव्हती. ‘ॐ नमोजी आद्या’ या ज्ञानेश्वरीच्या प्रारंभामध्येच गणपतीचे वर्णन आहे. त्यानुसार पंचमहाभुतांचे प्रतीक असलेले पाच कळस आहेत. मंदिराच्या सभामंडपातील खांबावर वेगवेगळ्या आकारातील मोराची आणि गणपतीला आवडणारी जास्वंदाची शिल्पे, शमी आणि गोपद्म हे शुभचिन्ह साकारले आहे. मखराच्या छतामध्ये गणेशयंत्र, तर गाभाऱ्यावर ब्रह्मणस्पती यंत्र बसविण्यात आले आहे. ‘रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत’ असे गीतामध्ये म्हटल्यानुसार गाभाऱ्याची सजावट वैशिष्टय़पूर्ण केली आहे. घुमटावर सप्तर्षी (सात ऋषी) असून सूर्य, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि शक्ती (पार्वती) हे पंचेश्वर गणपतीला नमस्कार करीत आहेत. गाभाऱ्याच्या खांबावर हत्ती, मोर, गाय यांच्या प्रतिकृती या कोरीवपणे केल्या आहेत. सभामंडपाच्या बाहेरच्या कमानीवर मगरीच्या तोंडातून आलेले मुख साकारले असून या हत्तीने सोंडेवर हे मंदिर तोलून धरले आहे असे त्यातून सूचित केले आहे. गणपतीची मूर्ती ही कमळावर विराजमान असून गाभारा िपडीच्या आकाराचा निमुळता करण्यात आला आहे. बाहेरच्या कळसांवर चौकोन, त्रिकोण, गोल, चंद्रकोर आणि िबदू अशा पंचाकृतींच्याआधारे कोरीव काम केले आहे. अगदी मोजमाप न घेताही  ब्रह्मणस्पती मंदिर नऊच्या पटीमध्येच साकारले गेले आहे. मंदिराची लांबी आणि उंची ९० फूट आहे.रुंदी ५४ फूट असून गाभाऱ्याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी ३६ फूट आहे. ब्रह्मणस्पती मंदिर साकारताना जो सृजनात्मक आनंद मिळाला त्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही, अशी भावना विवेक खटावकर यांनी व्यक्त केली.