शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या आठही विभागांना तब्बल सहा वर्षांनंतर पूर्णवेळ संचालक मिळाले असून अतिरिक्त कार्यभारामुळे वैतागलेल्या संचालकांना दिलासा मिळाला आहे. शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या आठही विभागांच्या संचालक पदांच्या नियुक्त्या पदोन्नतीच्या माध्यमातून बुधवारी करण्यात आल्या.
शालेय शिक्षण विभागात तब्बल सहा वर्षांनंतर संचालकांच्या आठही पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन किंवा चार संचालकांकडेच आठही पदांचा कार्यभार होता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांची माध्यमिक शिक्षण संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी गंगाधर मम्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मम्हाणे हे माध्यमिक शिक्षण सहसंचालक म्हणून कार्यरत होते. गेली पाच वर्षे प्रभारी असणाऱ्या प्राथमिक शिक्षण संचालकपदावर महावीर माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बालभारतीचे संचालकपदही २०११ पासून प्रभारी होते. त्यावर आता चंद्रमणी बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बोरकर हे बोर्डाचे नागपूर विभागाचे अध्यक्ष होते. परीक्षा परिषदेच्या संचालकपदी दिलीप सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहस्रबुद्धे हे बोर्डाचे लातूर विभागाचे अध्यक्ष होते. प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागामध्येही पाच वर्षांनतर पूर्णवेळ संचालकांची नियुक्ती होत आहे. शिवाजी तांबे यांची प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून ते बोर्डाच्या अमरावती विभागाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. बालचित्रवाणीलाही पाच वर्षांनंतर पूर्णवेळ संचालक मिळत आहे. बालचित्रवाणीमध्ये उपसंचालकपदी कार्यरत असलेल्या नंदन नांगरे यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संचालकांच्या नियुक्त्या शासनाकडून पदोन्नतीच्या माध्यमातून करण्यात आल्या. मात्र, त्यामुळे आता सहसंचालकांच्या आठ पदांसह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची २१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विभागांना पूर्णवेळ संचालक मिळाले असले, तरी मनुष्यबळाची चणचण अजूनही कायम आहे.