पुणे : शहरातील पुरानंतर झिकाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली असून, बुधवारी एकाच दिवशी सात नवीन रुग्ण आढळून आले. त्यातील सहा गर्भवती आहेत. शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या ७३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील डहाणूकर कॉलनी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झिकाचे सर्वाधिक १६ रुग्ण आहेत. त्या खालोखाल एरंडवणे क्षेत्रीय कार्यालयात १४ रुग्ण आहेत. खराडी १०, घोले रस्ता ७, सुखसागरनगर ६, पाषाण, मुंढवा प्रत्येकी ५, आंबेगाव बुद्रुक, कळस प्रत्येकी ३, लोहगाव, धनकवडी, कोरेगाव पार्क, वानवडी प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. शहरातील एकूण ७३ रुग्णांपैकी ३२ गर्भवती आहेत. शहरात झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांना सहव्याधी होत्या. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा >>>Pune accident case: शहरात वेगवेगळ्या अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू

शहरात पुरानंतर अनेक ठिकाणी पाणी साचले. महापालिकेकडून या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, पाऊस सुरू राहिल्याने या उपाययोजनांचा फारसा फायदा होऊ शकला नाही. या साचलेल्या पाण्यामुळे डासोत्पत्ती वाढून झिकाची रुग्णसंख्या वाढली आहे. शहरात बुधवारी ७ रुग्ण आढळून आले. त्यात डहाणूकर कॉलनी परिसरात ४ रुग्ण आढळून आले असून, त्यांतील तीन गर्भवती आहेत. खराडी परिसरात ३ गर्भवतींना संसर्ग झाला आहे. झिकाचा धोका गर्भवतींना अधिक असल्याने त्यांच्या तपासणीवर आरोग्य विभागाकडून भर दिला जात आहे. झिकाचा रुग्ण आढळून आल्यानंतर त्या परिसरातील गर्भवतींचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठविण्यात येत आहेत.

शहरातील झिकाचा प्रादुर्भाव

– एकूण रुग्णसंख्या – ७३

– गर्भवती रुग्ण – ३२

– रुग्ण मृत्यू – ४

शहरात पुरानंतर अनेक ठिकाणी पाणी साचून डासोत्पत्ती वाढली आहे. यामुळे झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. पूरग्रस्त भागामध्ये दोन वेळा डास प्रतिबंधात्मक औषध फवारणीसह इतर उपाययोजना केल्या जात आहेत. याचबरोबर जनजागृतीही केली जात आहे.डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका