पुणे : राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे. निकालात घट झाल्यामुळे पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरातील विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, यंदा लवकर निकाल जाहीर झाल्याने पदवी अभ्यासक्रमाचे वर्गही लवकर सुरू होणे अपेक्षित आहे.

उच्च शिक्षणाकडे जाण्यासाठी बारावीचा टप्पा महत्त्वाचा असतो. बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उच्च शिक्षणात पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असतात. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. राज्यात या परीक्षांची प्रक्रिया राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबवण्यात येत आहे. तसेच, विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह खासगी विद्यापीठेही प्रवेश परीक्षा घेतात. या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तर, राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पारपंरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले, यंदा बारावीचा निकाल कमी झाल्याने पात्रता गुणांमध्ये एक ते दोन टक्के घट होऊ शकेल. तसेच, निकाल लवकर जाहीर झाल्याने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर सुरू होतील.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बारावीनंतरच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा येत्या १५ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. जूनअखेरीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.-डॉ. पराग काळकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

राज्यातील २९ खासगी विद्यापीठांची संघटना असलेल्या प्रीमिनंट एज्युकेशन रीसर्च असोसिएशन (पेरा) या संघटनेतर्फे खासगी विद्यापीठांतील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पेरा सीईटी २२ ते २४ मे कालावधीत घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. या विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, संशोधन, उद्यमशीलतेला चालना देणारे अभियांत्रिकी, व्यवस्थापनासह विविध अद्ययावत अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.- डॉ. मंगेश कराड, अध्यक्ष पेरा, कार्यकारी संचालक एमआयटी एडीटी विद्यापीठ