कोकणापासून विदर्भापर्यंत राज्याच्या अनेक भागाला मंगळवारी दुपारनंतर वादळी पावसाचा तडाखा बसला, तर काही ठिकाणी गाराही पडल्या. ढगांचे हे मळभ लगेच तरी निवळण्याची शक्यता नसून, पुढील तीन दिवसांत राज्याच्या बहुतांश भागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून वादळी पाऊस पडला. तेच वातावरण अजूनही कायम आहे. विशेषत: दुपारनंतर पावसाच्या सरी आणि गारांचा वर्षांव हे चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात सोमवारी पाऊस व गारा पडल्यानंतर मंगळवारीही अनेक भागात पाऊस झाला. पाऊस झाला नाही तेथे बऱ्याचशा भागात ठिकाणी ढगाळ वातावरण कायम होते. या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी पाऊस / गारा पडलेली ठिकाणी : पुणे (०.९ मिलिमीटर), महाबळेश्वर (५), उस्मानाबाद (१), सांगली, अहमदनगर- राहता / कर्जत, रायगड- पोलादपूर, सिंधुदुर्ग- अंबोली / चौकुळ, परभणी, बीड, लातूर, वाशिम, मूर्तिजापूर, अकोला.
कोकणाला तडाखा
कोकणात मंगळवारी वारा-वादळासह जोरदार पाऊस पडला, काही ठिकाणी गारपीटही झाली, तर इतरत्र अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहिले. त्यामुळे आंबा बागायतदार पुन्हा धास्तावले आहेत. रायगडातील पोलापूर तालुक्यात सुमारे सव्वा तास गारपीट झाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या कणकवली, आंबोली, चौकुळ इत्यादी भागातही मंगळवारी पावसाने हजेरी लावली. चौकुळच्या परिसरात तर काही प्रमाणात गारपीटही झाली.
सांगलीत द्राक्षे, बेदाण्याचे नुकसान
जिल्ह्य़ात यंदाच्या हंगामात चौथ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावत सोमवारी रात्री विटय़ात १८.५ मिलीमीटर नोंद झाली. तासगाव, जत, पलूस तालुक्यात गारपिटीसह पावसाने दमदार हजेरी लावल्याने निर्यातक्षम द्राक्षे व बेदाण्याचे नुकसान पुन्हा झाले आहे. हवेतील गारवा गायब झाला असून आज दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.
हवामान खात्याने दिलेला पावसाचा अंदाज
११/१२ मार्च
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता; कोकणात हवामान कोरडे राहील.

१३ मार्च
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता; विदर्भात हवामान कोरडे राहील.

१४ मार्च
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.