पुणे : गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात रोजगाराच्या संधी अगदी कमी आहेत. यामुळे या भागातील महिलांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत मिळवून देण्यासाठी गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाची सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून, सायकल प्युअर अगरबत्ती कंपनीने या प्रकल्पाला पाठबळ दिले आहे. या माध्यमातून महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, प्रकल्पाची वार्षिक उलाढाल ७ कोटींवर पोहोचली आहे.
गडचिरोली हा घनदाट जंगल असलेला डोंगराळ भाग आहे. हा भाग अतिशय दुर्गम असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या लोकांचे जगणे सगळे वन विभागाच्या कामावर अवलंबून आहे. वन विभागाच्या कामाच्या ठिकाणी रोजंदारी मजूर म्हणून काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर येथील महिलांना उत्पन्नाचा स्त्रोत मिळवून देण्यासाठी २०१२ मध्ये गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाची सुरुवात झाली. येथील सुमारे १ हजार २०० महिला अगरबत्ती बनविण्याचे काम करीत आहेत. या महिलांचे छोटे गट असून, त्या उत्पादन केंद्र सुरू करून अगरबत्ती बनवितात. सध्या अशी सुमारे ३२ केंद्रे या प्रकल्पांतर्गत सुरू आहेत.
सायकल प्युअर अगरबत्ती कंपनीने २०१४ पासून गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाशी भागीदारी सुरू केली. याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन रंगा म्हणाले की, महिलांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न कंपनीने केला. कंपनीने सप्टेंबर २०१४ ते मार्च २०२३ या कालावधीत गडचिरोलीतील महिलांकडून ५ हजार ५०० टन कच्ची अगरबत्ती खरेदी केली. याचबरोबर कापसाच्या वाती बनविण्याचे काम या महिला करीत असून, त्यांच्याकडून ८ लाख डझन खरेदी करण्यात आल्या. तसेच, कंपनीने बेल, हिरडा आणि बेहडा याची खरेदी येथील आदिवासींकडून सुरू केली. त्यांचा वापर पूजेत हवन सामग्री म्हणून केला जातो.
ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा कल
सध्या ई-कॉमर्स मंचावर ग्राहकांचा अगरबत्ती आणि पूजा साहित्य खरेदीकडे कल वाढला आहे. याचबरोबर पर्यावरणपूरक उत्पादनांना ग्राहकांची अधिक पसंती आहे. गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीसोबत संपूर्ण पूजा सामग्री संचांना मागणी वाढत आहे. विशेषत: महानगरांमध्ये ही वाढ जास्त दिसून येत आहे, असेही अर्जुन रंगा यांनी स्पष्ट केले.
सायकल कंपनीकडून महिलांना अगरबत्ती उत्पादनाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच, उत्पादन यंत्रांची दुरुस्ती, व्यवसायाच्या नोंदवह्या ठेवणे, बँक खाते सांभाळणे या गोष्टींचेही प्रशिक्षण दिले जात आहे. गडचिरोली अगरबत्ती प्रकल्पाची वार्षिक उलाढाल पाच पटीने वाढून आता ७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. – अर्जुन रंगा, व्यवस्थापकीय संचालक, सायकल प्युअर अगरबत्ती