scorecardresearch

भाजप आमदारांचे विधानभवनात आंदोलन; उद्योगनगरीतील वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी

महापारेषणच्या भोसरी उपकेंद्रात बिघाड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात उद्भवलेल्या परिस्थितीचे  पडसाद गुरूवारी विधानमंडळात उमटले.

भाजपचे भोसरीतील आमदार महेश लांडगे यांनी गुरूवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले.

पिंपरी : महापारेषणच्या भोसरी उपकेंद्रात बिघाड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात उद्भवलेल्या परिस्थितीचे  पडसाद गुरूवारी विधानमंडळात उमटले. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. त्याचप्रमाणे, राज्य सरकार आणि उर्जामंत्र्यांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनही केले.

महापारेषण कंपनीच्या भोसरी उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मरमध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. यामुळे भोसरी व आकुर्डीमधील जवळपास ६० हजार ग्राहकांकडील तसेच सात हजार लघुउद्योगामधील वीज गायब झाली. त्यामुळे स्थानिक नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला. उद्योग क्षेत्राचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर, आमदार लांडगे यांनी मंगळवारी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. औद्योगिकनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला सातत्याने वीजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले, उद्योग क्षेत्रांचे १०० कोटींहून अधिक नुकसान झाले. उर्जा खात्याचे काम समाधानकारक नाही. असाच कारभार सुरू राहिल्यास त्रस्त नागरिकांकडून मोठे आंदोलन उभे राहील, असे लांडगे या वेळी म्हणाले.

यासंदर्भात लांडगे यांनी उर्जामंत्र्यांना निवेदन दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून महावितरण, महापारेषण कर्मचाऱ्यांकडून अत्यंत बेजबाबदारीने काम केले जात आहे. त्याचा परिणाम म्हणजे वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहेत. दिवसातून दोन ते चार वेळा ‘ब्रेकडाऊन’ होत असतो. यामुळे कारखान्यांचे उत्पादनही मंदावले आहे. वीज पुरवठय़ाची समस्या सोडवण्यासाठी महावितरणने दिलेला संपर्क क्रमांक सतत व्यस्त तथा संपर्क क्षेत्राबाहेर असतो. महावितरणचे अघिकारी वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देतात. अशा कारणांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तरी पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी लांडगे यांनी उर्जामंत्र्यांकडे केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Agitation bjp mlas vidhan bhavan demand permanent solution power crisis industrial city ysh

ताज्या बातम्या