पुण्यातील कचऱ्याची समस्या तीव्र झाल्यामुळे तो कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू झाल्यानंतर मोशीकरांसह शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रविवारी ‘रास्ता रोको’ आंदोलन करून विरोध व्यक्त केला. बराच वेळ आंदोलक रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष अतुल शितोळे, शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक धनंजय आल्हाट, राष्ट्रवादीचे नगरसेवक अरूण बोऱ्हाडे, मंदा आल्हाट, शरद बोऱ्हाडे, धनंजय भालेकर, पंडीत गवळी, फजल शेख, विजय लोखंडे आदींसह आंदोलनात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पुण्यात कचरा टाकण्याची समस्या दिवसेंदिवस उग्र होत चालली आहे. तेथील कचरा मोशी येथे टाकण्याच्या पर्यायावर शासनदरबारी विचार सुरू आहे. त्यास विरोध करण्यासाठी मोशीकरांनी रविवारी ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शनिवारी पिंपरी पालिका सभेतही या विषयावर वादळी चर्चा झाली.