पुणे : कात्रज भाग तसेच समाविष्ट गावांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कात्रज पाणीपुरवठा केंद्रासमोर ही घटना घडल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. आंदोलक पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत होते. अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

कात्रज गावठाण तसेच मांगडेवाडी, निंबाळकरवाडी या गावांचा महापालिकेत समावेश होऊनही पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत आहे. कात्रज चौकात कोंडी तसेच महापालिकेत समावेश होऊनही पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या निषेधार्थ कात्रज भागातील कार्यकर्ते नमेश बाबर यांनी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदनही देण्यात आले होते, असे बाबर यांनी सांगितले. कात्रज पाणीपुरवठा पाणी केंद्रासमोर आंदोलन सुरू करण्यात आले असून मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलक महिलांवर लाठीमार केल्याचा आरोप बाबर यांनी केला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

कात्रज पाणीपुरवठा केंद्रात आंदोलकांनी शिरण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा केंद्रात मोठे पंप तसेच इलेक्ट्रिक यंत्रणा आहे. आंदोलक पाणीपुरवठा केंद्रात शिरून तोडफोड करण्याचा प्रयत्नात होते. त्या वेळी बंदोबस्तास असणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यंत्रणेचे तोडफोड झाली असती तर पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता होती, तसेच दुर्घटना घडली असती. आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

– सागर पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन