भारत अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण – डॉ. मायी

हरितक्रांतीनंतर हे उत्पादन लोकसंखेपेक्षा अधिक पटीने वाढले असून हे यश सर्व कृषी विद्यापीठांच्या संशोधनाने, विकसित केलेल्या सुधारित तंत्रज्ञानाने आणि शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळाले आहे.

सध्या भारताचे अन्नधान्य उत्पादन २६० मि. टन असून आपला देश अन्न धान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. हरितक्रांतीनंतर हे उत्पादन लोकसंखेपेक्षा अधिक पटीने वाढले असून हे यश सर्व कृषी विद्यापीठांच्या संशोधनाने, विकसित केलेल्या सुधारित तंत्रज्ञानाने आणि शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मिळाले आहे, असे मत नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी येथे व्यक्त केले.
राज्यातील चार कृषी विद्यापीठे, जर्नल ऑफ अ‍ॅग्रीकल्चर रीसर्च अँड टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र कृषी उद्योजकता विकास महामंडळाच्या वतीने ‘कृषी उद्योजकता, व्यापारातील व व्यवसायातील जागतिक संधी’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटना वेळी डॉ. मायी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे उपस्थित होते. या वेळी वसंतदादा शुगर इंस्टिटय़ूटचे महासंचलाक डॉ. शिवाजीराव देशमुख, डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. ई. लवांदे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. जी. दाणी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलु आदी उपस्थित होते. तसचे विविध खासगी कंपन्या व यशस्वी कृषी उद्योजकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
अन्नधान्याचे उत्पादन वाढून देखील शेतकरी अजूनही हलाखीच्या परिस्थितीत असल्याचे सागून डॉ. मायी म्हणाले, शेतकऱ्यांची ही परिस्थिती बदलण्यासाठी उत्पादन तंत्रबरोबरच कृषी प्रकिया उद्योगाचे ज्ञान शेतकऱ्यांना दिले पाहिजे. कृषी उद्योजकतेला व प्रामुख्याने कृषी लघुउद्योगांना अधिक चालना दिली तर, उत्पादन वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक उत्कर्ष साधता येईल. तसेच कुठलाही उद्योग उभा करताना बऱ्याच अडी-अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींवर मात करून जो पुढे चालेल तोच यशस्वी कृषी उद्योजक होईल. विद्यार्थ्यांमध्ये नुसते कृषी शिक्षणच नाही तर, जोखीम पत्करण्याची क्षमता आणि त्या दृष्टीने संभाषण कला विकसित करणे गरजेचे असल्याचा सल्लाही डॉ. मायी यांनी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Agri product increase dr c d mayee

ताज्या बातम्या