पुणे : अहिल्यानगरमधील श्रीगोंदा येथून एकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पसार आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली. वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. साई संजय मदने (वय २३, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि वैभव सुभाष चौधरी (वय २६, रा. दौंड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात एकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात २० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. पसार आरोपी मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून मदने आणि चौधरी यांना पकडले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, संजय जाधव, उज्ज्वल मोकाशी, नागनाथ राख, ओंकार कुंभार यांनी ही कारवाई केली.
