पुणे : दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धेत राज्यातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रद्धा लोंढे या विद्यार्थिनीचा प्रकल्प सुवर्णपदकाचा मानकरी ठरला असून, ‘सुपर ६०’ प्रकल्पांमध्ये राज्यातील सात प्रकल्प निवडले गेले आहेत. त्यात पुण्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शिक्षण आयुक्तालयाने याबाबतची माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता विकसित करून त्यांच्या समाजोपयोगी नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय इन्स्पायर मानक प्रदर्शन आणि प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात येते. दिल्लीतील भारत मंडपम् येथे १२ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा झाली. २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांतील राज्यातील ३५हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

देशभरातील ८०० प्रकल्पांतून राज्यातील सात विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची सुपर ६० गटांत निवड झाली. सांगली येथील राजवर्धन काळे, पुणे येथील देविका ताड, अर्णव भुसारी, गीता धनवडे, सोलापूर येथील शांभमी अजगुंडे, वाशिम येथील विराज शिंदे या प्रतिभावान विद्यार्थ्यांचे प्रकल्प निवडले गेले. अहिल्यानगर येथील चांदगावच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रद्धा लोंढे या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावून इतिहास घडवला. ‘दृष्टिहीनांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षक सहायक’ हे प्रारूप सादर केले होते. दृष्टिबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित समावेशक, विद्यार्थिकेंद्रित संकल्पना श्रद्धाने तिच्या प्रकल्पातून सादर केली. श्रद्धाचे शिक्षक सुभाष गायकवाड यांनी या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले.

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीशिवाय शिक्षण घेता येण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शिक्षक सहायक प्रणालीमध्ये सूक्ष्म नियंत्रकाच्या मदतीने प्राप्त माहितीवर प्रक्रिया करून ३x२ ब्रेल सेलमध्ये बसवलेल्या विद्युत चुंबकीय सोलेनॉइड्सना कार्यान्वित केले जाते. त्यामुळे ब्रेल लिपीतील टोकदार पिन वर येतात आणि स्पर्शाद्वारे अक्षरे ओळखता येतात. या प्रणालीमुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अक्षरे, शब्द, वाक्ये स्वतंत्रपणे वाचता येतात. त्यातून स्वावलंबन, सर्वसमावेशक, सुलभ शिक्षणाला चालना मिळते.

राज्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. अहिल्यानगरच्या श्रद्धा लोंढेसह सातही विद्यार्थ्यांची वैज्ञानिक प्रज्ञा आणि समाजोपयोगी नवकल्पना शैक्षणिक प्रगतीची पावती आहे. विद्यार्थी आता केवळ पारंपरिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अभिनव प्रकल्प साकारत आहेत. विद्यार्थ्यांच्या अशा नवकल्पना, संशोधनाला राज्य सरकारकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येईल. – दादाजी भुसे, शालेय शिक्षणमंत्री