पुणे : ‘अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी लष्कराचा वेगवान प्रतिसाद अधोरेखित झाला. विमान कोसळल्यानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि लष्करी रुग्णालय यांच्या दरम्यान असलेली भिंत पाडण्याचा लष्कराने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरला. ती भिंत पाडल्यामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर काढून जीवितहानी टाळता आली,’ अशी माहिती लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासंदर्भात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (सीएमई) ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण आराखड्यातील कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सची भूमिका : जोखीम, लवचिकता, आणि प्रतिसाद’ या कार्यक्रमात सेठ बोलत होते. माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ), कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, लेफ्टनंट जनरल सईद अता हस्नैन या वेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमात सेठ यांनी आपत्ती व्यवस्थापनातील लष्कराच्या योगदानाचा आढावा घेताना पुणे, वायनाड येथील मदतकार्य, वायनाड येथे ४८ तासांत उभारण्यात आलेला पूल, परदेशातील मोहिमांबाबत भाष्य केले. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत ते म्हणाले, ‘अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेवेळीही लष्कराने वेगाने प्रतिसाद दिला. दुर्घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांतच लष्करी तळावरून १५० जवान घटनास्थळी पोहोचले. त्यात अभियंते, वैद्यकीय अधिकारी, अग्निशामक, शीघ्र कृती दल अशा सर्वांचा समावेश होता. लष्कराच्या अहमदाबाद तळावरील प्रमुखही घटनास्थळी उपस्थित होते.’