पुणे : ‘कृत्रिम प्रज्ञा (एआय) ही मानवी मेंदूला पर्याय ठरू शकणार नाही. माणसांच्या संवेदना, त्यांच्या भावना आणि नाते एआयला समजत नाही. एआय हे केवळ मदतीसाठी वापरण्याचे साधन आहे. त्याचा वापर जरूर करावा,’ असा सल्ला प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कल्याण गंगवाल यांनी शनिवारी दिला. ‘चिकित्सा करताना डॉक्टर आणि पेशंटचे भावनिक नाते निर्माण होते. केवळ डॉक्टरांच्या असण्यानेच कित्येकांना बरे वाटते. आजारातून बाहेर पडण्याचा विश्वास येतो. हे नाते एआयला निर्माण करणे अशक्य आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. सतीश बोरालिखित ‘द इंटेलिजन्स शिफ्ट : एआय इज फॉर एव्हरीवन’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गंगवाल यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. एआय तज्ज्ञ डॉ. आकाश माळवे, सतीश बोरा, संजोग बोरा या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एआयच्या आधारे आहार नियोजनाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या संजोग बोरा निर्मित ‘वोकॅल’ या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या ॲपवर बोलून कॅलरी नोंदवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
डॉ. गंगवाल म्हणाले, ‘सध्याच्या तरुण पीढीला ज्ञान आणि शोध हे केवळ विदेशातच आहे, असा गैरसमज झालेला दिसतो. मात्र, आपल्या देशात ज्ञानाची महान परंपरा होती. प्राचीन जैन मुनींनी लिहिलेल्या तत्वसुत्रांमध्ये आत्ताचे सर्व आधुनिक ज्ञान उपलब्ध आहे. जैन धर्मातील तीर्थंकरांना सुमारे २४ हजार वर्षांपूर्वी ‘एआय’चे ज्ञान होते. पांडुलिपीतील जैन हस्तलिखितांमध्ये त्यासंदर्भात अधिक माहिती मिळते. ‘मनो पर्याय ज्ञान’ या एका सुत्रात मनाचा मेंदूशी असलेला संबंध जैन मुनींनी उलगडला. मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी साधना, चर्या आणि चारित्र्य ही त्रिसूत्री त्यांनी सांगितली. आत्ताच्या वैज्ञानिकांना मेंदूच्या तीन चतुर्थांश भागाची अद्याप माहिती नाही.’
‘‘एआय’मुळे अनेक कामे सोपी होतात. प्रत्येकानेच एआय वापरने गरजेचे झाले आहे. अनेक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. सॉफ्टवेअर आणि आयटीमधील अनेक नोकऱ्यांची जागा एआयने घेतल्याचे दिसते. जवळपास प्रत्येकच क्षेत्र एआयमुळे प्रभावित झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने एआयचा वापर कसा करायचा, याचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे,’ असे डॉ. मावळे यांनी नमूद केले. ‘अजूनही अर्ध्याहून अधिक लोकसंख्या एआयचा वापर करत नाही. आगामी काळात होणारे बदल लक्षात घेता, प्रत्येकानेच एआय साक्षर होणे गरजेचे आहे,’ असे सतीश बोरा यांनी सांगितले.
