पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ माहिती साठवणारी यंत्रणा नसून मानवी मेंदूच्या धर्तीवर विचार करून नवनवीन गोष्टी घडवणारी अफाट क्रांती आहे. मात्र, त्याच्या अतिवापरामुळे येत्या काळात जगभरात ऊर्जेचे मोठे संकट उभे राहणार आहे,’ असा इशारा भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद काळे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात दिला.
डॉ. दीपक शिकारपूर लिखित आणि अमलताश बुक्स प्रकाशित ‘एआय युगाचा वेध’ या पुस्तकाचे प्रकाशन काळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘आयसर’चे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद नातू, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, डीइएसचे कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, पुस्तकाच्या सहलेखिका सुप्रिया बडवे आदी या वेळी उपस्थित होते.
‘डेटा सेंटर्स साठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च होत असून, त्यातून निर्माण होणाऱ्या ९७ टक्के उष्णतेचे व्यवस्थापन करता येत नाही,’ असे काळे यांनी नमूद केले. तंत्रज्ञान कंपन्यांची अणुभट्ट्यांकडे होणारी वाटचाल आणि इलॉन मस्क यांच्या अंतराळातील डेटा सेंटरची संकल्पनेची व्यवहार्यता आदी मुद्द्यांवर डॉ. काळे यांनी विस्तृत विवेचन केले.
डेटा सेंटर्स आणि ऊर्जेचे महासंकट
अंतराळात जमीन, जागा सहज उपलब्ध असते आणि तिथे ‘नैसर्गिक शीतलीकरण’ मिळते; कारण अंतराळात अत्यंत कमी तापमान असते. परंतु पृथ्वीवर या डेटा सेंटर्ससाठी वापरल्या जाणाऱ्या आवश्यक ऊर्जेपैकी ९७% पेक्षा जास्त ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होत आहे. ती सर्व ऊर्जा केवळ उष्णतेचे व्यवस्थापन करणे, वातानुकूलन आणि सिस्टीम्स थंड ठेवण्यामध्येच वाया जात आहे. असे काळे यांनी नमूद केले.
अणुभट्ट्या आणि भविष्यातील पर्याय
ऊर्जेच्या या प्रचंड गरजेमुळेच आज मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि गूगल यांसारख्या मोठ्या कंपन्या इतर स्रोतांऐवजी ‘स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर्स’ अर्थात लहान अणुभट्ट्या उभारण्याविषयी बोलत आहेत. या सिस्टीम्ससाठी सतत २० ते ३० मेगावॅट ऊर्जेची गरज आहे. परंतु ही ऊर्जा तेवढ्याच प्रमाणात उष्णतादेखील निर्माण करणार आहे. जोपर्यंत आपण या उष्णतेचे योग्य व्यवस्थापन करू शकत नाही, तोपर्यंत या प्रणाली आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या किंवा व्यावहारिक ठरणार नाहीत. असेही काळे यांनी आपल्या बीज भाषणात सांगितले. हे पुस्तक तरुण वर्गाने संग्रही ठेवावे,’ असे आवाहन नातू यांनी केले.
शिकारपूर म्हणाले, ‘आजच्या आधुनिक युगात केवळ तांत्रिक कौशल्ये पुरेशी नसून, विचारपूर्वक सारासार विवेक बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. ‘एआय’चा योग्य व नैतिक वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या काळात दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी परस्पर संवाद, सहसंवेदना आणि मानवी मूल्ये जपण्याची गरज आहे. ‘एआय’ माणसाची जागा घेऊ शकत नाही, तर त्याला आत्मसात करून चांगला माणूस बनणे आणि समाजाला जोडणे हेच खरे जीवनकौशल्य आहे.’ शरयू निराधर यांनी सूत्रसंचालन केले. तर प्राची जोशी यांनी आभार मानले.
