पुणे : ‘कौैशल्ये ही व्यक्तिसापेक्ष बाब आहे. मात्र, सध्याचा काळ पाहता ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’सारखे कौशल्ये मुलभूत झाले आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्याची गरज असते. त्या प्रमाणात ‘प्रॉम्प्ट इंजिनिअर्स’ची मागणी वाढत आहे. त्यामुळे विद्यापीठांच्या सर्व विद्याशाखांमध्ये ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’ अभ्यासक्रम अनिवार्य करणे गरजेचे आहे,’ असे मत संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी रविवारी व्यक्त केले.

‘विदिशा विचार मंच’च्या वतीने ज्येष्ठ उद्योजक डॉ. अरुण फिरोदिया यांच्या हस्ते दीपक शिकारपूर यांना स्वामी विवेकानंद युवा सक्षमीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी शिकारपूर बोलत होते. विश्वकोष निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, मंचच्या संचालक ममता क्षेमकल्याणी या वेळी उपस्थित होत्या.

शिकारपूर म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार, हे अर्धसत्य आहे. या क्षेत्रात तितक्याच नवीन संधी निर्माण होणार आहेत, हे तितकेच खरे आहे. ‘एआय’कडे प्रॉडक्टिव्हीटी बुस्टर म्हणून पाहिले गेले पाहिजे.’

डॉ. दीक्षित म्हणाले, ‘तंत्रज्ञानाचा वेग झपाटून टाकणारा आहे. सामाजिक जीवनावर त्याचे मूलगामी परिणाम होत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान हे जीवनमूल्यांना पर्याय ठरू शकत नाही. विवेकाच्या चौकटीतच मानवाचा विकास होऊ शकतो. त्यासाठी महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या अंत्योदयावर आधारलेल्या समाजाची निर्मिती करणे गरजेचे आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विज्ञान-तंत्रज्ञान पोहचविणे आवश्यक आहे.’

‘विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सोपे झाले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्याने आत्मनिर्भर भारताचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत’, असा विश्वास फिरोदिया यांनी व्यक्त केला. ‘सध्या केवळ पदवी पुरेशी नसते, तर उद्योजकतेसाठीची आवश्यक कौशल्ये शिकणे अनिवार्य झाले आहे,’ असे डॉ. पराग काळकर यांनी सांगितले. योगेश रांगणेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. नितीन जळूकर यांनी आभार मानले.