पुणे : पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी (प्रथम माहिती अहवाल – एफआयआर) आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे (एआय) नोंंदवून घेतल्या जाणार आहेत. पुणे पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर बाणेर पोलीस ठाण्यात ‘एआय’चा वापर करुन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
‘या तंत्रज्ञानामुळे तक्रारदाराच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडणाऱ्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना या तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. गुन्ह्यांचे स्वरुप विचारात घेता कलमे आणि ‘एफआयर’ मसुद्याचे काम त्वरित करता येणे शक्य होणार आहे’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
‘पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी. गुन्ह्यांची कलमे, ‘एफआयआर’च्या मसुद्यातील किचकटपणा कमी करण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यासाठी विशेष संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तक्रारदाराने तक्रार नोंदविताच गुन्ह्याचे स्वरुप विचारात घेऊन ‘एफआयआर’ दाखल करताना कलमांचा अंतर्भाव संबंधित मसुद्यात (एफआयआर ड्राफ्ट) केला जाणार आहे.
विशेष संगणकीय प्रणाली स्वत:च कलमांचा अंतर्भाव करणार आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात येणार आहे. हे काम करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी संबंधित मसुदा पाहून त्यात आवश्यक ते बदल करतील. मात्र, या तंत्रज्ञानामुळे तक्रारदारांसह पोलिसांचे कामकाज गतिमान होण्यास मदत होणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नमूद केले.
‘एआय’ची मदत कशी होणार ?
‘एआय’चा वापर गुन्हे दाखल करताना ‘व्हाॅईस टू वर्ड’ या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. खासगी कंपनीकडून ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तक्रारदाराने माहिती दिल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी हे संबंधित प्रणालीत माहितीची नोंद करणार आहेत. त्यानंतर काही वेळात ‘एआय’कडून दाखल होणाऱ्या फिर्यादीचा मसुदा तयार होईल. हा मसुदा तयार झाल्यानंतर त्यात आवश्यक ते बदल पोलीस अधिकारी, कर्मचारी करतील. त्यानंतर त्वरित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया (सीआर नंबर- पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा क्रम) पार पडणार आहे. या बाबतची माहिती तक्रारदाराला लगेच उपलब्ध करून दिली जाणार आहे.
