पुणे : देशातील गृहनिर्माण क्षेत्रातील घसरणीचे वारे चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीतही कायम राहिले आहे. कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानामुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात अनिश्चितता निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचे वारे सुरू आहे. याचा गंभीर परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर दिसून येत आहे. देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत सुमारे ६ टक्के घट झाली आहे. ही घट पुण्यात सर्वाधिक १५ टक्के असून त्या खालोखाल मुंबईत ८ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

अनारॉक ग्रुपने देशातील महानगरांतील गृहनिर्माण क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, महानगरांमध्ये यंदा एप्रिल ते जून तिमाहीत एकूण ९० हजार ७१५ घरांची विक्री झाली तर १ लाख ६ हजार नवीन घरांचा पुरवठा झाला. घरांच्या विक्रीतील घट पुणे १५ टक्के, मुंबई ८ टक्के, चेन्नई ९ टक्के, दिल्ली ६ टक्के आहे. याचवेळी बंगळूरुमध्ये घरांच्या विक्रीत १ टक्का तर हैदराबाद २ टक्के आणि कोलकाता १० टक्के वाढ झाली आहे.

पुण्यात दुसऱ्या तिमाहीत १३ हजार ९० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १५ टक्के घसरण झाली आहे. याचवेळी पुण्यात दुसऱ्या तिमाहीत १२ हजार ७३५ नवीन घरांचा पुरवठा झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. मुंबईत दुसऱ्या तिमाहीत घरांची विक्री २८ हजार ७१० झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ८ टक्के घट झाली आहे. याचवेळी मुंबईत दुसऱ्या तिमाहीत नवीन घरांचा पुरवठा ३४ हजार ५५५ असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के वाढ झाली आहे.

पुरवठ्यावर युद्धाचा परिणाम

याबाबत अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले की, पश्चिम आशियातील युद्धामुळे पुरवठा साखळी खंडित झाली. त्याचा परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे नवीन घरांचा पुरवठा कमी झाला आहे. आगामी काळात पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. याचवेळी घरांच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली आहे. देशातील घरांच्या विक्रीमध्ये आलिशान घरांचा वाटा मोठा आहे. मोठ्या विकासकांकडून आलिशान घरांच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. देशातील महानगरांमध्ये घरांच्या किमतीत वार्षिक ७ टक्के वाढ झाली आहे.

खरेदीसाठी हाता आखडता

जागतिक क्षमता केंद्रांमुळे विकसित होणारी रोजगार केंद्रे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या परिसरात घरांना मागणी आहे. आलिशान घरांना प्रामुख्याने मागणी दिसून येत आहे. परंतु, पश्चिम आशियातील युद्ध आणि एआयमुळे आयटी आणि आयटी संलग्न सेवा क्षेत्रात अनिश्चिततेचे वारे निर्माण झाले असून, त्यामुळे ग्राहकांकडून खरेदीसाठी हात आखडता घेतला जात आहे, असे अनुज पुरी यांनी सांगितले.

जागतिक मंदी कारणीभूत

जागतिक मंदीला कारणीभूत अशा दोन गोष्टींचा परिणाम सर्वच क्षेत्रांमधे दिसून येत आहे. यात मुख्यत्वे अमेरिका, इस्रायलचे इराणविरोधातील युद्ध तसेच रशिया-युक्रेन युद्ध यांचा जागतिक परिणाम होत आहे. याचबरोबर झपाट्याने विकसित होणा एआय तंत्रज्ञानाचा परिणामही मोठा आहे. एआयमुळे अनेक कामांना लागणारा वेळ कमी झाला आहे. आयटी क्षेत्रातील जुन्या पद्धतीच्या कामांसाठी मनुष्यबळाची गरजही कमी होत आहे. त्यामुळे अनेक जणांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. याचाच परिणाम गृहनिर्माण क्षेत्रावर होत आहे, असे हिंजवडी एम्प्लॉईज अँड रेसिडंट्स ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेंद्र हुलसुरे यांनी सांगितले.