पुणे : ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये पारंपरिक (एण्ट्री लेव्हल) नोकऱ्या कमी होत आहेत. त्यामुळे भविष्यात केवळ एक टक्का स्टार्ट-अप हे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरतील,’ असे मत बजाज जनरल इन्शुरन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तपन सिंघेल यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) संचालित ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च’च्या (आयएमडीआर) ५१ व्या पदवीप्रदान सोहळ्यात सिंघेल बोलत होते. ‘आयएमडीआर’च्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, डीईएसचे कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, संचालिका डॉ. शिखा जैन उपस्थित होत्या. समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे आणि विविध पुरस्कारांचे वितरण, तसेच ‘अन्वेष-इनोव्हेशन टू इम्पॅक्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन व ‘पीच परफेक्ट’ या स्टार्टअप स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. सिंघेल म्हणाले, ‘ एआयमुळे नोकऱ्या घटत असल्या, तरी नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या, कौशल्य क्षमता असणाऱ्या तरुणांसाठी अमर्याद संधी उपलब्ध झाल्या आहेत, याकडेही दूर्लक्ष करून चालणार नाही. केवळ समस्या सोडविण्याची क्षमता ही कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाची बाब आहे. आज एका व्यक्तीलाही एकहाती कंपनी उभारून कोट्यवधी रुपये कमावण्याची संधी आहे. संधी मिळाल्यावर तिचे सोने करा आणि त्या हातातून जाऊ देऊ नका. शिक्षण हे केवळ बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण नसून, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची ताकद देते. अपयशाला न घाबरता नव्या उमेदीने पुढे जात नोकरी, व्यवसायातील अपेक्षा समजून घ्याव्यात. त्यातूनच तुम्हाला आनंदी जीवन जगण्याची कला अवगत होणार आहे.’

डॉ. जैन म्हणाल्या, ‘पुण्यातील पहिले बिझिनेस स्कूल म्हणून आयएमडीआरची ओळख असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पीजीडीएम अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्योगजगतासोबत करार, संशोधनावर विशेष भर दिला आहे. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करत यशस्वी व्हावे आणि संस्थेचे व पालकांचे नाव उंचवावे.’

समारंभात विविध श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. ‘जयदिप शिवदासानी पुरस्कार’ सर्वोत्तम क्रीडापटू (पीजीडीएम बॅच) रौनक राठी, पीजीडीएम एकूण कामगिरीमध्ये ओम वैद्य यांना, ‘दिवंगत अर्जुन सिंह गांधी पुरस्कार’ कलात्मक उत्कृष्टेसाठी ईशा जोगळेकर, ‘विजय हथीरामानी यंग प्रोफेशनल प्राईज’ स्वानंदी भानोसे, विजय हथीरामानी करंडक एकूण उत्कृष्टतेसाठी अक्षय भोसले, ‘चेतन शहा पुरस्कार’ शांभवी रघुवंशी, मलिना रॉय पुरस्कार समृद्धी गाडे, सुवर्ण पदक वैष्णवी दैठणकर, कांस्य पदक श्रेया शेवाळे आणि ब्रिगेडियर एन. बी. ग्रँट पुरस्कार प्रतीक्षा पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात आले. डाॅ. पृथा उबगडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सोनाली खुर्जेकर यांनी आभार मानले.