Milind Khandekar Speech / पुणे : ‘बातमीदारी हे श्रमाचे काम आहे. त्यामुळे ‘एआय’च्या काळातही बातमीदारी टिकेल. पण, ‘एआय’चा वापर करणे जमले नाही, तर मागे पडण्याचा धोका आहे. बातमीदाराला ‘एआय’चा वापर करणे शिकावेच लागेल…’ ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडे समूहाच्या ‘तक चॅनल्स’चे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी शनिवारी ‘एआय क्रांती : पत्रकारिता बहरेल की ओसरेल?’ हा कळीचा प्रश्न घेऊन आयोजित केलेल्या व्याख्यानाचा हा गोषवारा.
फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानात खांडेकर बोलत होते. ते म्हणाले, ‘तंत्रज्ञानातील बदलांमुळे काही नोकऱ्या जातात, तर काहींचे स्वरूप बदलते. आता ‘एआय’मुळे ‘व्हाइट कॉलर’ नोकऱ्या धोक्यात येतील, मात्र प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन कराव्या लागणाऱ्या ‘ब्ल्यू कॉलर’ नोकऱ्या टिकतील, असे म्हटले जाते. कोणत्याही क्षेत्रात बदल पचवून नव्या गोष्टी शिकाव्या लागतात. त्यामुळे ‘एआय’ शिकून त्याचा आपल्या कामासाठी कशा प्रकारे वापर करून घेता येईल, याचा विचार करायला हवा. आपण ‘एआय’ शिकलो नाही, तर मागे पडू.’
‘पुण्यात ऑटो रिक्षा सेवा सुरू झाली, तेव्हा टांगेवाल्यांचे काय होणार म्हणून आंदोलन झाले होते. मात्र, घोड्याचे काय होणार याचा विचार कोणी केला नाही. ‘एआय’च्या काळात माणसाची अवस्था घोड्यासारखी होण्याची भीती आहे. आज घोडा केवळ रेसकोर्सवर आहे. म्हणजे, माणूस राहील, पण त्याला काही काम नसेल असे म्हटले जाते. चाळीस वर्षांपूर्वीची वृत्तपत्रातील स्थिती आणि आजची स्थिती यात झपाट्याने बदल झाला आहे. ‘कम्पोझिटर’सारखी माणसे कमी झाली. आज मोबाइलवरून बातमी केली जाऊ लागली आहे,’ याकडे मिलिंद खांडेकर यांनी लक्ष वेधले.
‘आता ‘एआय’ काळ सुरू आहे. आजवरच्या अनेक बदलांमध्ये बातमीदार टिकून राहिला. पण, आता प्रयत्न न केल्यास टिकणे अवघड आहे. ‘एआय’चे परिणाम आता बाकी क्षेत्रांत दिसायला लागले आहेत. पुण्यातील एक मोठी कंपनी ‘एआय’च्या माध्यमातून कर्जपुरवठा करते आहे. आयटी कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. माणूस करू शकणारी सगळी कामे आता ‘एआय’ करायला लागला आहे. त्यामुळे पत्रकारितेत काही बदलणार नाही, हा भ्रम दूर करावा लागेल. नव्या बदलांनुसार पत्रकारानेही नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे,’ असे खांडेकर यांनी नमूद केले.
मिलिंद खांडेकर म्हणाले, ‘केवळ काही तरी शोधायचे म्हणून ‘एआय’चा ‘गुगल’सारखा वापर करणे चुकीचे आहे. ‘गुगल आणि ‘एआय’मध्ये फरक आहे. गुगल हे मोठे ग्रंथालय आहे, तर ‘एआय’ प्राध्यापकासारखा आहे. ‘एआय’द्वारे ज्ञान किंवा माहिती कशी मिळवायची, हे माहीत असते. माहितीचा स्रोत असल्याशिवाय ‘एआय’ला काहीही करता येत नाही. आता ‘एआय’ वापरताना माहितीची पडताळणी करून घेणे महत्त्वाचे आहे.’
पुणे पत्रकार प्रतिष्ठानाचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, पत्रकार प्रतिभा चंद्रन, प्राची कुलकर्णी, मयुरेश कोण्णूर आदी या वेळी उपस्थित होते.
