पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरातून उसाच्या उत्पन्नात सुमारे ३० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे समोर आले आहे. ‘एआय’मुळे उसाच्या शेतीचे अचूक नियोजन करणे शक्य झाले असून, खतांच्या खर्चात आणि पाण्याच्या वापरात ५० टक्क्यांनी कपात होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्यातून हे तंत्रज्ञान विकसित केले असून, बायफ फाउंडेशनच्या माध्यमातून ‘एआय’चा हा प्रयोग उसाबरोबरच अन्य पिकांंमध्येही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती, बायफचे अध्यक्ष डॉ. भारत काकडे यांनी दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरुवातीला एक हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आता मार्चपर्यंत पाच हजार शेतकऱ्यांना उसाच्या शेतीत एआयचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती बारामती अग्रीकल्चरल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांनी दिली.

‘या प्रकल्पात प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करून त्यांना गेल्या तीन-चार वर्षांत सातत्याने मार्गदर्शन करण्यात आले. उपग्रह तंत्रज्ञान, प्लॉट मॅपिंग, स्वयंचलित हवामान केंद्र, आयओटी सेन्सर प्रणालीचा वापर करण्यात आला. संवेदक तंत्रज्ञानामुळे मातीमधील सर्व अन्नद्रव्यांचे प्रमाण अवघ्या १० ते १५ मिनिटांत कळते. हवामानातील तापमान, आर्द्रता, पानांचा ओलावा, सूर्यप्रकाशाची तीव्रता याची माहिती मिळते,’ असे नलावडे यांनी सांगितले. प्रकल्पाला हेक्टरी २५ हजार रुपयांपर्यंत खर्च येत असून, उत्पादन खर्चात आणि पाण्याच्या वापरात सुमारे ५० टक्क्यांनी कपात होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘‘एआय’मुळे शास्त्रीय पद्धतीने खत आणि पाणी व्यवस्थापन करता येते. जमिनीची सुपीकता, पोषणमूल्य आणि दर्जा टिकवता येतो. पीक कधी घ्यायचे याची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळते. हवामान बदलामुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम वेळीच रोखून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न मिळवणे शक्य झाले आहे,’ असे निरीक्षण डॉ. काकडे यांनी नोंदवले.

बदलत्या शेतीतंत्रात आणि पीकपद्धतीत ‘एआय’ची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचे फायदे सर्व शेतकऱ्यांना मिळावेत म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी बायफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. – डॉ. भारत काकडे, अध्यक्ष, बायफ फाउंडेशन

ऊस शेतीतील हा प्रयोग यशस्वी झाला असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधन, प्रयोग करण्यात येत आहे. – नीलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती ॲग्रीकल्चरल ट्रस्ट

पालेभाज्या, फळभाज्यांमध्येही ‘एआय’चा प्रयोग

उसाबरोबरच पालेभाज्या, फळभाज्या, कांदा इत्यादी पिकांमध्येही ‘एआय’च्या वापरातून शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न मिळावे म्हणून ‘बायफ’कडून राज्यभरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बायफच्या उरळी कांचन येथील प्रकल्पात जून महिन्यापासून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी बारामती ॲग्रीकल्चरल ट्रस्टबरोबर सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती डॉ. भारत काकडे यांनी दिली.