पुणे : कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात अधिकाधिक वाढू लागला. आता एआयच्या मदतीने रोगाची निदानही होऊ लागले आहे. या दृष्टीने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारकडून क्षयमुक्त भारत अभियान ही १०० दिवसांची मोहीम देशभरात राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत रुग्णांचा शोध, तपासणी आणि निदानामध्ये कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.

क्षयमुक्त भारत मोहिमेंतर्गत ‘एआय’ आधारित ‘व्हल्नरेबिलिटी मॅपिंग’द्वारे देशभरात क्षयाचा प्रादुर्भाव जास्त असलेली १ लाख ५८ हजार गावे आणि शहरी वॉर्ड शोधण्यात आले. त्यासाठी ३० निकषांचा विचार करण्यात आला. त्यात त्या भागातील क्षयरुग्णांची संख्या, कुपोषण, लोकसंख्येची घनता आणि सामाजिक-आर्थिक स्थिती या प्रमुख निकषांचा समावेश होता. ‘एआय’च्या मदतीने या ३० निकषांच्या आधारे देशभरातील विदेचे विश्लेषण करून क्षय जोखीमग्रस्त गावे आणि शहरी वॉर्ड शोधण्यात आले. त्यात राज्यातील ११ हजार ९१ जोखीमग्रस्त गावे व शहरी वॉर्डचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात या मोहिमेंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रिय तपासणी करण्यात येत आहे. त्यातही ‘एआय’ची मदत होत आहे. ‘एआय’आधारित हाताने वापरता येणाऱ्या क्ष-किरण यंत्राद्वारे जलद तपासणी करून संशयित रुग्णांना तत्काळ नॅट चाचणीसाठी पाठविण्यात येत आहे. निक्षय पोर्टलवरील ‘एआय’ विश्लेषणाच्या आधारे रुग्ण तपासणीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. त्यात वृद्ध, मधुमेही, कुपोषित, एचआयव्हीग्रस्त, क्षयरुग्णांचे संपर्क, स्थलांतरित व झोपडपट्टीतील नागरिकांची १०० टक्के तपासणी केली जाणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये निक्षय मोबाइल युनिटद्वारे सेवा पोहोचविण्यात येणार आहेत, असे आरोग्य विभागाने नमूद केले.

Award Banner

इतर आजारांचीही तपासणी

या मोहिमेत आयुष्मान आरोग्य शिबिरांद्वारे क्षयरोगासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, ॲनिमिया व कुपोषण यांसारख्या आजारांची एकत्रित तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विविध विभागांचा समन्वय साधत रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, स्वयंसहायता गट, माय भारत स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. निक्षय मित्र उपक्रमाद्वारे रुग्णांना पोषण व मानसिक आधार दिला जाणार आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

‘एआय’च्या मदतीने क्षयरुग्णांच्या तपासणीसाठी दिवसनिहाय व गावनिहाय सूक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे क्षयरुग्णांचा लवकर शोध, वेळेत उपचार, उपचारातील सातत्य आणि मृत्युदरात घट साध्य होण्यास मदत होणार आहे. राज्यात क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने ही मोहीम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. – डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग