पुणे : वेदाध्ययनाला आता दहावी, बारावीची समकक्षता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेद संस्कृत शिक्षण मंडळाची वेदभूषण, वेदविभूषण प्रमाणपत्रे ही अनुक्रमे दहावी आणि बारावीशी समकक्ष मानली जाणार असून, ही प्रमाणपत्रे प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये तंत्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे शक्य होणार आहे.
महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठानातर्फे महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेद संस्कृत शिक्षण मंडळ (एमएसआरव्हीएसएसबी) या नावाने स्वतंत्र शालेय शिक्षण मंडळाची स्थापना केली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या शिक्षण मंडळाला अधिकृत शिक्षण म्हणून मान्यता दिली आहे. त्यानुसार या मंडळामार्फत दिली जाणारी प्रमाणपत्रे देशभरातील केंद्रीय, राज्य मंडळांच्या दहावी, बारावीच्या प्रमाणपत्रांइतकीच मान्य असतील. या प्रमाणपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांतील प्रवेश, केंद्र, राज्य शासनाच्या नोकर्यांसाठी अर्ज करता येणार असल्याचे नमूद करण्यात आले.

