पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमित होणाऱ्या हवाई उड्डाणांना पक्ष्यांचा धोका कमी व्हावा, यासाठी हवाई दलाने पाच सदस्यांचे स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. ‘हाय डेसिबल झोन गन’ने पक्ष्यांना परिसरात येण्यास प्रतिबंधित केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी विमानतळाच्या धावपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्षी असल्याने नियोजित उड्डाणांना तीन तास विलंब झाला. शुक्रवारी दिल्लीवरून पुणे विमानतळावर उतरणारे विमान पक्ष्यांच्या अडथळ्यामुळे दुसऱ्या मार्गावर वळवावे लागले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

या विमानतळावर हवाई दलाचा नियमित सराव सुरू असतो. येथून नागरी उड्डाणेदेखील वाढविण्यात आली आहेत. विमानतळाच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी हवाई दलाने स्थानिक स्वराज्य संस्थांसह, जिल्हा प्रशासनाबरोबर बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही. अस्वच्छतेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास वाढला असून, त्याचा विपरित परिणाम विमानांच्या उड्डाणांवर होत आहे. हवाई दलाने उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.

‘गॅसी फायर’ प्रकल्प कोठे ?

विमानतळ परिसरात लोहगाव, येरवडा, वाघोली, लोणीकंद, केसनंद महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींचा परिसर आहे. या परिसरात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कचरा विघटनासाठी ‘गॅसी फायर’ प्रकल्प बसविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपाययोजना काय?

  • पक्ष्यांना पांगविण्यासाठी पाच सदस्यांचे पथक
  • मोठा आवाज निर्माण करणाऱ्या उपरकणांचा (हाय डेसिबल झोन गन) अवलंब
  • पक्ष्यांचा अधिवास कमी करण्यासाठी धावपट्टीजवळील गवताची छाटणी
  • धावपट्टी आणि विमानतळ परिसरात सकाळ-संध्याकाळ गस्त घालणे
  • धावपट्टीच्या परिसरात फटाके फोडणे

विमानतळ परिसरातील पक्ष्यांमुळे हवाई उड्डाणांना अडथळे निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवाई उड्डाणांच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असली, तरी आजूबाजूच्या परिसरातील कचऱ्याची चिंता कायम असून याबाबत महापालिका प्रशासनाला प्रश्न विचारावे. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ.