पुणे : हवाई प्रवाशांना आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगी आता तातडीने उपचार मिळणार आहे. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात प्रवाशांवर मोफत उपचार केले जाणार असून, हा कक्ष २४ तास खुला असणार आहे.

आपत्कालीन वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन गुरुवारी पुणे विमातळाचे संचालक संतोष ढोके आणि ग्रँट मेडिकल फाउंडेशनचे (रुबी हॉल क्लिनिक) अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांच्या हस्ते झाले. हा कक्ष नवीन टर्मिनल इमारतीतील चेक-इन भागात आहे. एखाद्या प्रवाशांवर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास या कक्षात ही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षात प्रवाशांवर मोफत उपचार केले जाणार असून, तो २४ तास खुला असणार आहे. रूबी हॉल क्लिनिककडून हा कक्ष चालविला जाणार आहे.

हेही वाचा – भाजपाच्या माजी नगरसेविकेकडून माहिती अधिकार कार्यकर्त्याला चपलेने चोप, महापालिकेच्या मुख्य इमारतीतील प्रकार

विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये महत्वाच्या ठिकाणी ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) उपकरणे बसविण्यात आली आहेत. एखाद्या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यास अशा रुग्णांना विजेचा धक्का देऊन त्यांच्या हृदयाचे ठोके सामान्य करण्याची प्रक्रिया या उपकरणाच्या माध्यमातून केली जाते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर या उपकरणाचा वेळीच वापर केल्यानंतर रुग्ण वाचण्याची शक्यता अधिक वाढते. नवीन टर्मिनलमध्ये ही उपकरणे बसविण्यात आलेल्या ठिकाणी ते वापरण्याच्या सूचनाही सोप्या शब्दांत शेजारी देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – जिल्ह्यात महायुतीला धक्का? माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला असून, अनेक ठिकाणी ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) उपकरणे बसविण्यात आली आहेत. याचबरोबर रुग्णवाहिकाही आपत्कालीन वैद्यकीय प्रसंगासाठी तैनात करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणे विमानतळ प्रशासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ