पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या पथकाने (कस्टम) कारवाई करुन २६ कोटी ८० लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. विमानतळाच्या आवारातील ‘एअर कार्गो’ विभागात ही कारवाई करण्यात आली. थायलंडहून आयात करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा हवाबंद डब्यात (टिन) हायड्रोपोनिक गांजा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले.

थायलंडहून पुण्यात आलेल्या आयात मालाच्या कंटेनरमध्ये चिनी खाद्यपदार्थ ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. संबंधित कंटेनरवर तसा उल्लेख होता. ‘मँडरिन ऑंरेज साॅस’ नाव असलेला खाद्यपदार्थ थर्माकोलच्या खोक्यात ठेवण्यात आला होता. एअर कार्गाे विभागात कस्टमच्या पथकाकडून गुरुवारी (२६ मार्च) नियमित तपासणी सुरू होती. संशय आल्याने कस्टमच्या पथकाने संबंधित थर्माकोलचे खोके उघडले. तेव्हा हवाबंद डब्यात पांढऱ्या रंगाची भुकटी होती. डब्याची तपासणी केल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या भुकटीखाली प्लास्टिक पिशवीत हायड्रोपोनिक गांजा ठेवल्याचे उघडकीस आले.

कस्टमच्या पथकाने संपूर्ण मालाची तपासणी केली. तेव्हा हवाबंद डब्यात लपविण्यात आलेला ७६ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत २६ कोटी ८० लाख रुपये किंमत आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हायड्रोपोनिक गांजाची तस्करी प्रकरणात सखाेल तपास

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून पाठविण्यात आलेला हायड्रोपोनिक गांजा यापूर्वी जप्त करण्यात आला होता. विमानतळावरील एअर कार्गो विभागात थायलंडहून आयात करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या डब्यात मोठ्या प्रमाणावर हायड्रोपोनिक गांजा सापडल्याने कस्टमकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात करण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून हायड्रोपोनिक गांजा ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. हायड्रोपोनिक गांजाची नशा उच्चभ्रू वर्गात केली जाते. या गांजाची किंमत साध्या गांज्यापेक्षा जास्त असल्याची माहिती कस्टममधील अधिकाऱ्यांनी दिली.