पुणे : उच्च शिक्षणात एकूण विद्यार्थी प्रवेश गुणोत्तर (ग्रॉस एन्रोलमेंट रेशो) वाढविण्याचे उद्दिष्ट असताना, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये देशातील पदवी स्तरावरील नोंदणी घटल्याचे आकडेवारी सांगते. राज्यातील नोंदणीत मात्र वाढ दिसते. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांसाठीचे अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाचे अहवाल नुकतेच जाहीर केले. त्यात ही बाब स्पष्ट झाली.

पदवीनंतर रोजगार उपलब्ध नसल्याचा, तसेच काही प्रमाणात नव्या शिक्षण धोरणानंतर पदवी स्तरावरील अध्यापनाबाबत संदिग्धता असल्याचा हा परिणाम असल्याचे काही तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. या अहवालात देशभरातील उच्च शिक्षणातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएच.डी स्तरावरील सविस्तर आकडेवारी, स्थिती मांडण्यात येते. अहवालांचे विश्लेषण केले असता, प्रामुख्याने पदवी स्तरावर नोंदणी घटल्याचे आणि पदविका स्तरावरील नोंदणी वाढल्याचे दिसून येते. देशात २०१९-२० मध्ये ३ कोटी ६ लाख ४७ हजार २८७ विद्यार्थ्यांनी पदवी स्तरावर नोंदणी केली होती. जी एकूण विद्यार्थी नोंदणीच्या ७९.५ टक्के होती. त्यानंतर प्रवेश वाढून २०२२-२३ मध्ये देशभरातील ३ कोटी ४६ लाख ७५ हजार ५८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जी एकूण विद्यार्थी नोंदणीपैकी ७७.७ टक्के होती. तर २०२३-२४ मध्ये ३ कोटी ४५ लाख ८२ हजार २६८ कोटी विद्यार्थ्यांनी पदवी स्तरावर प्रवेश घेतला. जी एकूण विद्यार्थी नोंदणीच्या ७६.८ टक्के आहे.

या आकडेवारीत नियमित, दूरस्थ, ऑनलाइन, खासगी या सर्व प्रकारांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यानुसार, २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये पदवी स्तरावरील नोंदणी ९३ हजारांनी घटली. एकीकडे पदवी स्तरावर नोंदणी घटतानाच पदविका स्तरावरील प्रवेश वाढले. त्यानुसार २०१९-२० मध्ये २६ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. २०२२-२३ मध्ये ३१ लाख २ हजार ७५, तर २०२३-२४ मध्ये ३३ लाख १५ हजार ७२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणावर ६ टक्के खर्च करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी ४ टक्क्यांवर खर्च होत होता. आता तो खर्च २.६ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. इतक्या कमी खर्चात राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उद्दिष्ट्ये साध्य होणार नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. विद्यार्थी प्रवेश गुणोत्तर वाढवणे हा एक भाग झाला. पण, आधुनिक काळातील विद्यार्थी घडवण्यासाठी नवीन अध्यापन पद्धतींबाबत शिक्षकांना अजूनही मार्गदर्शन झालेले नाही. विद्यापीठांचे विभाग ओस पडायला लागले आहेत. मराठी शाळा बंद पडायला लागल्या आहेत. कौशल्य विकास वगैरे केवळ बोलण्यापुरत्या गोष्टी आहेत. संशोधनाला निधी मिळत नाही. एकूणच या परिस्थितीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. – डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू

कोट २ तरुणांच्या मानसिकतेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. पदवीनंतर पुढे काय हा प्रश्न तरुणांच्या मनात आहे. पारंपरिक पदवीधर तरुणांसाठी नोकरीच्या संधी निर्माण होत नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे तरुण एक पर्याय म्हणून पाहतात. पण, तेथे प्रचंड स्पर्धा आहे. तरीही, काही तरी होईल, या आशेने स्पर्धा परीक्षांच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांचा टक्का मोठा आहे. पदवीचे महत्त्व कमी झाल्याची भावना वाढीस लागली आहे. त्याचा परिणाम प्रवेशांवर दिसतो. – डॉ. अरुण अडसूळ, माजी कुलगुरू