पुणे : देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्वाचे योगदान देणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाच्या सुरक्षितेसाठी सल्ला देणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आपण पुण्यात राहिलो असल्याची आठवण सांगितली. देशाच्या सुरक्षेचे चाणक्य अशी ओळख असलेल्या डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी पुणे शहरा बाबतच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

लोकमान्य टिळक ट्रस्ट च्या वतीने दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना देण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. व्यासपीठावर डोवाल यांचे आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी जागेवर उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. भारत माता की जय च्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या.

डोभाल यांनी राष्ट्रीय सुरक्षा बद्दल दिलेल्या योगदानाचे कौतुक सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये केले. हाच धागा पकडत डोभाल यांनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, ‘ माझ्याविषयी बरेच काही बोलले गेले, पण सत्य काय हे मी ही सांगू शकणार नाही’. लोकमान्य टिळकांचे विचार आजही तितकेच कालसुसंगत आहेत. राष्ट्र निर्मिती मागील त्यांच्या भावनांचा प्रत्येक भारतीयाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

पुणे ही लोकमान्य टिळकांची कर्मभूमी आहे. ‘पुणे शहराशी माझाही छोटासा संबंध आहे,’ असे सांगून अजित डोभाल म्हणाले, ‘मी ७६ वर्षांपूर्वी लष्करात कार्यरत माझ्या वडिलांच्या बदलीमुळे पुण्यात आलो होतो. सव्वा ते दीड वर्ष पुण्यात राहिलो. माझ्या शिक्षणाची सुरुवात पुणे शहरात झाली. दर मंगळवारी माझी आई मला येथे असलेल्या चतुःशृंगी देवीच्या मंदिरात घेऊन जायची. घरी बनविलेल्या गूळ-खजुराच्या बर्फीचा नैवेद्य देवीला दाखवून आम्ही तो खायचो.

आमच्या शाळेत प्रार्थनेनंतर वरिष्ठ शिक्षक मार्गदर्शनपर व्याख्यान देत. त्यात मला सर्वप्रथम लोकमान्य टिळकांविषयी माहिती मिळाली.’ आज ७६ वर्षानंतर ज्यांच्याबद्दल पहिल्यांदा ऐकलं होतं त्याच लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला ही मोठी भाग्यची गोष्ट आहे. अशा दोन आठवणी त्यांनी सांगत पुणे शहराशी असले ऋणानुबंध स्पष्ट केले.

डोभाल म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. त्यांची राष्ट्र उभारणीची परिकल्पना काय होती, याचा आजच्या तरुण पिढीने गांर्भीयाने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुण पिढीला कदाचित असे वाटत असेल, की भारत नेहमीपासूनच आजच्यासारखा होता. आपल्याला मिळालेले बोलण्याचे स्वातंत्र्य, एवढाच स्वातंत्र्याचा अर्थ नाही’.

भारताच्या विकासाने सर्वच लोक खूप आनंदी आहेत, असे नाही. भारताचा विकास अनेक लोकांना, अनेक देशांना अनेक हितसंबंधांसाठी नुकसानकारक वाटतो,’. ‘देशाच्या हितासाठी तरुण वर्गाने स्वत:ला समर्पित केले पाहिजे. मी केवळ राष्ट्रहितासाठीच काम करीन. माझे काही छोटे-मोठे वैयक्तिक हितसंबंध असले, तरीही मी त्याकडे दुर्लक्ष करीन, अशी भूमिका घेतली पाहिजे,’ अशी अपेक्षाही डोभाल यांनी व्यक्त केली.