पुणे : ‘स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वत:च्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे नव्हे,’ अशा शब्दांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी तरुणांचे कान टोचले. लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आंदोलन करताना तरुणाईने वापरलेली भाषा, त्यावर समाजमाध्यमांवर केले जाणारे मिम्स यावर विविध स्तरातून टीका होत आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी देखील सत्काराला उत्तर देताना त्यावर भाष्य केले.

डोभाल म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. त्यांची राष्ट्र उभारणीची परिकल्पना काय होती, याचा आजच्या तरुण पिढीने गांर्भीयाने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुण पिढीला कदाचित असे वाटत असेल, की भारत नेहमीपासूनच आजच्यासारखा होता. आपल्याला मिळालेले बोलण्याचे स्वातंत्र्य, एवढाच स्वातंत्र्याचा अर्थ नाही’.

‘स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकमान्य टिळकांसह इतर देशभक्तांनी दिलेल्या लढ्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यासाठी संघर्षाचा कठीण मार्ग स्वीकारून अन्यायाचा प्रतिकार करायचा आणि त्या संघर्षात विजय मिळवायचा, हे सांगून लोकमान्यांनी देशातील तरुण आणि सर्वसामान्य जनतेमध्ये नवे चैतन्य, आत्मविश्वास आणि पुरुषार्थ जागविला, हे तरुण पिढीने विसरता कामा नये.’

‘अनेक जण आज आपल्या अधिकारांविषयी बोलतात. मात्र, या अधिकारांचा आपण दुरुपयोग केला, तर हे अधिकार मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले, त्यांच्या आत्म्यांना किती दुःख होईल, याचा विचार आपण करीत नाही. भारताच्या विकासाने सर्वच लोक खूप आनंदी आहेत, असे नाही. भारताचा विकास अनेक लोकांना, अनेक देशांना अनेक हितसंबंधांसाठी नुकसानकारक वाटतो,’ असे त्यांनी नमूद केले.

‘देशाच्या हितासाठी तरुण वर्गाने स्वत:ला समर्पित केले पाहिजे. मी केवळ राष्ट्रहितासाठीच काम करीन. माझे काही छोटे-मोठे वैयक्तिक हितसंबंध असले, तरीही मी त्याकडे दुर्लक्ष करीन, अशी भूमिका घेतली पाहिजे,’ अशी अपेक्षाही डोभाल यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘अजित डोभाल यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड ही राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव आहे. २०१४ पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांनी भारताच्या सुरक्षा धोरणाला नवे परिमाण दिले. त्यांच्या ‘सक्रिय प्ररोधन’ (प्रोॲक्टिव्ह डिटरन्स) संकल्पनेमुळे भारताची सुरक्षा रणनीति अधिक प्रभावी झाली.’ ऋषिकेश बडवे यांनी लोकमान्य स्तवन गायले. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले.