राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “मला खासदार…”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

भाजपाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश-गोव्यासह देशपातळीवरील निवडणुकीच्या राजकारणात उतरल्यावरून टीका केली. फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी बोचरी टीका केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रापुरतं जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचं उत्तर सडेतोडपणे देईल. देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल. “

“मला बारामतीकरांनी जरी खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण…”

“राजकीय जीवनात मला ३० वर्षे झाली. मला बारामतीकरांनी जरी खासदार म्हणून निवडून दिलं होतं, पण ६ महिन्यात मी परत आलो. शरद पवार यांना दिल्लीला जावं लागलं आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो. त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. मी महाराष्ट्रात समाधानी आहे. माझं माझं काम चाललेलं आहे,” असं म्हणत अजित पवारांनी या घडामोडींवर सुरुवातीला बोलणं टाळलं.

हेही वाचा : “अजित पवारांकडे पुण्यातील कोणता आमदार, किती वाजता कोणत्या हॉटेलमध्ये असतो याची सर्व कुंडली”

मात्र, नंतर अजित पवार यांनी फडणवीस यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. “फडणवीसांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे हे लोक उत्तर देतील. शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचं देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोललं पाहिजे, तारतम्य पाळलं पाहिजे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवारांकडून पुणे जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा

अजित पवार म्हणाले, “एखाद्या जागेचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली. सगळे एका विचाराचे लोक निवडून आले आहेत. आज आम्ही पुरंदर तालुक्यातून निवडून आलेल्या दिगंबर दुर्गाडे यांना चेअरमन म्हणून संधी दिली आहे. व्हाईस चेअरमन म्हणून पहिल्यांदा बँकेत निवडून आलेले सुनील चांदेरे यांची निवड केली.”

“चांदेरे हे मुळशी तालुक्यातील अ वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. दिगंबर दुर्गाडे ड वर्गाचं ओबीसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सर्वांनी या दोघांना संधी देण्याचं काम एकमताने केलं,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

“आता बँका चालवणं आधीच्या तुलनेत स्पर्धात्मक”

अजित पवार पुढे म्हणाले, “या दोघांवरही मोठी जबाबदारी आहे. आता बँका चालवणं आधीच्या तुलनेत स्पर्धात्मक झालं आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारची नियमावली येते. त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून शेतकऱ्यांना, सहकारी संस्था, पतसंस्थांना कर्जपुरवठा करायचा असतो. हा कर्ज पुरवठा करताना दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे दोघेही या नियमांचा विचार करतील. आमचा त्यांना पाठिंबा आहे.”

“आम्ही निवड झालेल्यांना पारदर्शक कारभार करायला सांगितलं आहे. कुठेही चुकीच्या गोष्टी करता कामा नये. खास बात तर अजिबात करता कामा नये. कागदांची पुर्तता आणि धोरणात बसत असेल तर कोणत्याही गटातटाचा, जातीधर्माचा असो त्याला मदत झाली पाहिजे. हीच अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेची परंपरा आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajit pawar answer devendra fadnavis criticism over ncp and sharad pawar amid election pbs

ताज्या बातम्या