पुणे लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून पुण्याच्या जागेबाबत निर्णय घेतील. आम्ही विजय मिळवून शकतो का हे ही पहावे लागेल, असे रविवारी स्पष्ट केले. पवार यांच्या भूमिकेनंतर अजित पवार यांनीही नरमाईची भूमिका घेत ज्या पक्षाला बहुमत त्या पक्षाला महाविकास आघाडी मदत करेल, असे स्पष्ट केले.
हेही वाचा >>> पुणे लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा, शरद पवार म्हणाले, “शेवटी कोण…”




पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. पोटनिवडणूक होणार की नाही, या बाबत चर्चा सुरू असतानाच पोटनिवडणूक होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात जास्त ताकद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच ही जागा लढवेल, असे अजित पवार यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले असून काँग्रेसच्या स्थानिक, तसेच वरिष्ठ नेत्यांनीही पुण्याची जागा काँग्रेसचीच आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेवरून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यावर बोलताना पवार यांनी रविवारी ही प्रतिक्रिया दिली.
पुण्याच्या जागेबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. जागेबाबत दावे होत असले तरी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते त्याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. आम्ही येथून निवडून येतो की नाही, हेही पहावे लागेल. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यालाच महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल. त्याबाबत चर्चा करून निर्णय होईल. तोपर्यंत ज्यांना कोणाला दावे करायचे आहेत त्यांनी दावे करावेत. दावे करून काही फरक पडत नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>> अजित पवार यांनी काँग्रेसला पुन्हा डिवचले… म्हणाले, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त
दरम्यान, शरद पवार यांनी ही भूमिका घेतल्यानंतर अजित पवार यांनी ही सावध भूमिका घेतली. मात्र पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची जास्त ताकद असल्याचा पुनरूच्चार करत त्यांनी काँग्रेसला पुन्हा डिवचले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे. कोणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिले पाहिजेत. तसेच काँग्रेसला पडलेली मतेही विचारात घ्यावी लागणार आहेत. एखाद्या मतदारसंघात जागा निवडून येण्याची शक्यता कमी असेल आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षाची ताकद तिथे जास्त असेल तर ती जागा मित्र पक्षाला दिली गेली पाहिजे. दुसरीकडे जरी अशीच उलट परिस्थिती असेल. तेव्हाही असेच घडले पाहिजे. जागांची अदलाबदलही करायला हवी, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र या संदर्भात कोणी काही बोलून उपयोग नाही. पुण्याची जागा कोण लढवणार, याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून घेतील, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.