scorecardresearch

… तर आरोप झालेच नसते! जलसंपदा विभागातील घोटाळ्याच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती

मी कधी बदनामीची पर्वा केली नाही, धडाडीने काम करणे हा माझा स्वभाव आहे. माझ्या मताशी ठाम राहतो, चूक झाली तर माफीही मागतो, असेही अजित पवार म्हणाले.

… तर आरोप झालेच नसते! जलसंपदा विभागातील घोटाळ्याच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती
जलसंपदा विभागातील घोटाळ्याच्या आरोपांबाबत अजित पवारांची स्पष्टोक्ती (लोकसत्ता टीम)

पुणे : जलसंपदा विभागातील माझ्या कामातील चांगल्या कामाची चर्चा कमी झाली, तर काही कामांबाबत उगाचच आरोप करून बदनामी करण्यात आली. माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झाला नाही. तत्कालीन जलसंपदा सचिव सुरेश सोडळ यांचे ऐकले असते तर आरोप झालेच नसते, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. मी कधी बदनामीची पर्वा केली नाही, धडाडीने काम करणे हा माझा स्वभाव आहे. माझ्या मताशी ठाम राहतो, चूक झाली तर माफीही मागतो, असेही अजित पवार म्हणाले.

राजहंस प्रकाशनतर्फे जलसंपदा विभागातील माजी निवृत्त सचिव सुरेश सोडळ यांच्या ‘माझी जीवनधारा’ पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे, निवृत्त सचिव विद्यानंद रानडे, राजहंस प्रकाशनचे मुख्य संपादक डॉ. सदानंद बोरसे, अभियंता मित्रचे संपादक डॉ. कमलकांत वडेलकर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे महापालिकेच्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रम पत्रिकेतून अजित पवारांना वगळले!

पवार म्हणाले, की जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून काम करताना राज्य पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, शेती आणि पिण्यासाठी मुबलक पाणी असावे यासाठी प्रयत्न केले. राज्य आणि राज्यातला शेतकरी महत्त्वाचा असतो. काहीवेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यातून बदनामीही झाली. सोडळ सोलापूरच्या दुष्काळी भागातून आलेले असल्याने जलसंपदा विभागात तळमळीने काम केले. माझ्या राजकीय कारकिर्दीत वित्त विभाग, जल संपदा, ऊर्जा विभाग अशा विविध जबाबदाऱ्या निभावल्या. वडनेरे, सोडळ हे माझ्या जलसंपदा विभागातील कामाचे साक्षीदार आहेत.

२००३ मध्ये जलनीती, त्यानंतर पाण्याचे लेखा परीक्षण, सिंचन कायदा अशा नव्या गोष्टी केल्या. त्यातून काही फायदे आणि काही तोटे झाले. पाणी हाच राज्याच्या विकासाचा गाभा आहे. मंत्री आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील हा विश्वास अधिकाऱ्यांना वाटत नाही. त्याचा फटका विभागाला बसतो.
वडनेरे म्हणाले, की सोडळ हे धोरणप्रिय अभियंता आहेत. ४४ वर्षे शासनात काम करण्याची दुर्मीळ संधी सोडळ यांना मिळाली. सचिव म्हणून त्यांनी सिंचनासाठी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान मोठे आहे. महाराष्ट्राच्या सिंचनाचा इतिहास लिहिला जाईल त्यात निश्चित सोडळ पर्व असेल.

हेही वाचा – “किती नेते आले-गेले, संभाजी महाराजांची धर्मवीर उपाधी…” भाजपच्या शहराध्यक्षांची अजित पवारांवर टीका

सोडळ म्हणाले, गेली ४५ वर्षे पाण्याच्या क्षेत्रात काम केले. २०१६ पासून माझे ज्ञान विद्यार्थ्यांना देत आहे. तसेच, माझे महाविद्यालयीन काळातील जीवन, शेतीतील माझे अनुभव, मंत्रालयात केलेले काम अशा आठवणी माझी जीवनधारा या पुस्तकात मांडल्या आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 20:30 IST

संबंधित बातम्या