ajit pawar criticized modi government on budget 2023 | Loksatta

“मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’”; अजित पवारांचं टीकास्त्र; म्हणाले, “नऊ राज्यांना…”

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Ajit Pawar, NCP, Opposition Leader, BJP, Power
अजित पवार ( संग्रहित छायाचित्र )

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी काल अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चुनावी जुमला’ असल्याची टीका अजित पवार यांनी केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा – “मी ३० ते ३२ वर्ष राजकीय जीवनात आहे, सत्तेत असतांना मी कधीच…”, अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

मोदी सरकारकडून नऊ राज्यांना डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. आगामी काळात कर्नाटकच्या निवडणुका आहेत, तिथे साडेतीन हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. याच कर्नाटक राज्याला लागून महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्रालासुद्धा तेवढे पैसे द्यायला हवे होते. केंद्र सरकारला महाराष्ट्रातून सर्वात जास्त पैसा मिळतो. अशा वेळी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिकचे पैसे दिले पाहिजे. आज मुंबईत अनेक प्रश्न आहेत. मेट्रो, वाहतूक, झोपडपट्टी आदी प्रश्न आज प्रलंबित आहेत. इथे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या हिताची कोणतीही घोषणा झाली नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. तसेच मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला आहे असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेचं कौतुकही केलं. मोदी सरकारने मागे जाहीर केलं होतं. शेतकऱ्यांच्या साखर कारखान्याबाबत अधिकचा भाव दिला असताना त्याला आयकर लावला होता. ही कर लावू नये अशी मागणी होती. बरीच वर्ष हे प्रकरण चालू होतं. कालच्या अर्थसंकल्पानंतर हे प्रकरण निकाली निघालं. या गोष्टीचं समाधान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – कसबा पेठ पोटनिवडणूक: शिवसेना आग्रही असल्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी खळबळजनक दावा करत कोणत्याही परिस्थितीत मला अटक करण्यात येईल, असं विधान केलं होते. यावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. “जितेंद्र आव्हाडांवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकारणात कधी कोण सत्तेत, तर कधी विरोधी पक्षात असतं. राजकीय द्वेषातून कधी कोणीच त्रास देऊ नये. आमचं सरकार असताना आताचे सत्ताधारी म्हणतात की काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला.”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 13:39 IST
Next Story
पुणे: “आरोपी पकडा अन् बक्षीस मिळवा…!” कोयता गँगचा धुमाकूळ