पुणे : विमान कोसळून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने बारामतीवर शोककळा पसरली. बारामती तालुक्यातील दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात येत असून, सोमेश्वर, पणदरे, सुपा, शिर्सुफळ आदी गावांमधून बारामतीकडे जाण्यासाठी नागरिकांची रीघ लागली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी अजित दादांवर प्रेम करणाऱ्या बारामतीकरांनी अजितदादांच्या निधनाच्या विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. नक्की काय झाले, याची स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करण्यासाठी गावागावातून बारामतीमध्ये लोक जमत आहेत. तर, परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
‘दादा इतक्यात जाऊच शकत नाही, अजून बरेच काम बाकी आहे. अजितदादांना मुख्यमंत्री होताना पहायचे होते. नियतीने असा अचानक घाला घातला,’ अशी भावना एका बारामतीकाराने व्यक्त केली.
मुंबईहून अजित पवार यांच्या विमानाने बारामतीकडे उड्डाण केले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजितदादा बारामतीत आले होते. निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात अजित दादांची सभा होणार होती. मात्र, विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना दुर्घटना घडली. अपघातात वैमानिकांसह अजित पवार, दोन पोलीस कर्मचारी, स्वीय सहायक असे सहा जण होते. विमान कोसळल्यानंतर स्फोट झाला. अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) सांगण्यात आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह बारामती तालुक्यात शोककळा पसरली. तालुक्यातील सर्व दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. हातातले काम जिथल्या तिथे सोडून, नागरिक बारामतीमध्ये गोळा होत आहेत.
‘बारामतीच्या विकासासाठी अजित पवारांचा वाटा अत्यंत महत्वाचा होता. अजित दादांनीच विकसित केलेल्या बारामती विमानतळ परिसरात त्यांचा मृत्यू व्हावा, ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. पहाटेपासूनच अजितदादा बारामतीतील विकासकामांची पाहणी करत. प्रत्येक कामाचा ते स्वतः आढावा घेत. आता दादांच्या निधनाने बारामती पोरकी झाली,’ अशा भावना बारामतीकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शाळा महाविद्यालयांना सुट्टी
विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे बारामती तालुक्यातील शाळा महाविद्यालये सुट्टीच्या तयारीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आदेश येताच सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. पाल्यांना घरी सोडून अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जाण्यासाठी शाळेबाहेर पालकांनीही गर्दी केली आहे.
लग्न समारंभ पुढे ढकलले
अजितदादांच्या निधनामुळे येत्या काही दिवसात होणारी लग्नकार्य पुढे ढकलण्यात आली आहेत. तळ्यातील नागरिकांनी स्वतःहून हा निर्णय घेतला असून, मंगलकार्यालये, सभागृह बंद ठेवण्यात येणार आहेत.
