अजित पवारांना आणखी एक धक्का; मामेभावाच्या पुण्यातील घरावर ईडीचा छापा

अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्यांवरील कारवाईमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Ajit pawar ed raids cousin jagdish kadam house pune

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीने पुन्हा छापेमारी केली आहे. अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या पथकाकडून छापा टाकण्यात आला आहे. जगदीश सध्या दौंड शुगरचे संचालक आहेत. दौंड शुगर्स, जरंडेश्वर साखर कारखाना यांदर्भात ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

जगदीश कदम हे दौंड शुगर या कारखान्याचे संचालक आहेत. यासंदर्भात इडीकडून तपास करण्यात येत आहे. ईडीने दौंड शुगर संबधित लोकांची याआधी ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जगदीश कदम यांची चौकशी करण्यात येत आहे.

अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्यांवरील कारवाईमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याआधीही काटेवाडीमध्ये ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली होती.

याआधी आलेगाव दौंड येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात प्राप्तीकर विभागाने सात ऑक्टोबर रोजी सकाळी शोध मोहिम सुरू केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोहिमेंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. त्यावेळी जगदीश कदम यांची प्राप्तीकर विभागाने पुणे येथे चौकशी केली होती. तर वीरधवल जगदाळे यांच्याकडे कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत कारखान्याचे व्यवहार व करविषयक चौकशी केली होती.

दरम्यान, अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्यांच्या साखर कारखान्यांवर छापेमारी केली होती. यासोबत अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी आणि कोल्हापूर येथील बहिणीच्या कार्यालयावर छापेमारी केली होती.

आयकर विभागाच्या या कारवाईनंतर अजित पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. “राजकीय हेतूने इन्कम टॅक्सने रेड टाकली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सचे अधिकारीच सांगू शकतील. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्यावर मला काही बोलायचं नाहीये. कारण मी सुद्धा एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे. माझ्या बहिणी ज्यांची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झालं. त्या त्यांच्या-त्यांच्य़ा घरी अतिशय चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील दोन बहिणींच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सने धाड टाकल्या आहेत. याच्या पाठीमागचं कारण मला समजू शकलेलं नाही,” असे अजित पवारांनी म्हटले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajit pawar ed raids cousin jagdish kadam house pune abn

Next Story
राज्याला वीज टंचाई भासणार नाही- पवार
ताज्या बातम्या