scorecardresearch

अजित पवारांकडून बंडखोर राहुल कलाटेंना फुगीर बेडकाची उपमा; कलाटे म्हणाले, “चिंचवडची जनता..”

अजित पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटेंवर सडकून टीका केली होती. अजित पवारांनी कलाटे यांना फुगीर बेडकाची उपमा दिली होती. त्यांना राहुल कलाटे यांनी उत्तर दिले आहे.

Ajit Pawar frog comment Rahul Kalate
अजित पवारांकडून बंडखोर राहुल कलाटेंना फुगीर बेडकाची उपमा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पुणे : महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उभे असलेले शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटेंवर सडकून टीका केली होती. अजित पवारांनी कलाटे यांना फुगीर बेडकाची उपमा दिली होती. त्यांना राहुल कलाटे यांनी उत्तर दिले आहे. “चिंचवडची जनताच मला विजयी करून उत्तर देईल. अजित पवारांनी माझ्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर बोलायला हवे होते”, असे राहुल कलाटे म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा पार पडला. मेळाव्यात अजित पवार यांनी राहुल कलाटेंवर सडकून टीका केली होती. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे: पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने; पोलीस महासंचालकांची माहिती

अजित पवारांच्या टिकेला उत्तर देताना बंडखोर राहुल कलाटे म्हणाले की, अजित पवार हे काय म्हणाले आहे ते मी ऐकले नाही. ते जर असे बोलले असतील तर त्यांनी चिंचवडच्या जनतेचा आढावा घेतला असेल. जनता मात्र शिट्टी (उमेदवारी चिन्ह) वाजवत आहे. त्यामुळे त्यांना राग आला असेल. त्यांच्यावर मी बोलणे योग्य नाही, ते खूप मोठे नेते आहेत. शहरातील जनतेला अपेक्षा आहे की त्यांनी शहरातील प्रश्नावर बोलावे. वंचितला पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीने मागणी केली आहे, याबाबत मला माहिती नाही. पण, प्रकाश आंबेडकर यांनीच सांगितले होते की राहुल कलाटे यांना उमेदवारी द्या. ते योग्य उमेदवार आहेत, असे त्यांनी सांगितले होते. ते योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मला किती मते पडतील हे चिंचवडची जनता ठरवेल, कोणते नेते ठरवणार नाहीत. चिंचवडची जनता दाखवून देईल की त्यांचा मनात काय आहे, असा टोला कलाटे यांनी अजित पवार यांना लगावला.

हेही वाचा – पुणे: पुणे-नगर महामार्गावर ट्रकच्या धडकेत डॉक्टर महिलेचा मृत्यू

महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात अजित पवार काय म्हणाले?

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्यामुळे संतापलेल्या अजित पवार यांनी कलाटेंवर सडकून टीका केली होती. उमेदवारी अर्ज पाठीमागे घे म्हणून राहुल कलाटे यांची शेवटच्या मिनिटांपर्यंत मनधरणी केली. मात्र त्यांनी माघार घेतली नाही, असे म्हणत अजित पवारांनी कलाटे यांना फुगीर बेडकाची उपमा दिली. त्यांना काही हजार मते पडतील हे जनता दाखवून देईल आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनता निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 18:32 IST