महाराष्ट्रातील जवळपास ७०० विद्यार्थी भरतीसाठी आसाममध्ये गेले. मात्र, या ७०० पैकी अनेक तरूण करोना बाधित आढळल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्यांनी क्वारंटाईन केले आहे. मात्र, त्यांची परतीची तिकिटं १७ जानेवारीची असल्याने त्यांची गैरसोय होतेय. त्यामुळे त्यांना १६ जानेवारीलाच विलगीकरणातून मोकळं करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील ७०० तरूण आसाममध्ये भरतीसाठी गेले आहेत. या ७०० तरुणांपैकी अनेक मुलं करोना पॉझिटिव्ह आलेत. आसाम सरकारच्या नियमानुसार त्यांना तिथं ५ दिवस विलगीकरणात राहावं लागेल, पण त्यांची परतीची तिकिटे १७ जानेवारीची आहेत. त्यामुळे त्यांना १६ जानेवारीला विलगीकरणातून मोकळे करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”

“विना मास्क फिरणाऱ्यांकडून ४६ लाख रुपयांचा दंड वसूल”

पुण्यातील करोना संसर्गावर बोलताना अजित पवार म्हणाले, “पुण्यात पॉझिटिव्हीटी रेट ६ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर पोहचला आहे. विना मास्क फिरणाऱ्यांकडून ४६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. लोकांनी करोना निर्बंध गांभीर्याने घ्यावेत.”

“पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जंबो कोविड हॉस्पिटल्स पुन्हा सुरू करणार”

“पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जंबो कोविड हॉस्पिटल्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. या हॉस्पिटल्ससाठी लागणारा स्टाफ भरण्याचे आदेश देण्यात आलेत. जर गरज पडली तर या हॉस्पिटल्सचा उपयोग होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव आणि रूग्णसंख्या वाढण्याचे कारण लोकांनी नियमांचे पालन न करणे हे आहे,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

“स्वतःच्या स्वतः कीटच्या साहाय्याने करोना चाचणी करणारे संसर्ग लपवतात”

अजित पवारांनी करोना चाचणीच्या सेल्फ कीटवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “जे स्वतःच्या स्वतः कीटच्या साहाय्याने करोना चाचणी करत आहेत ते लोक अनेकदा करोना संसर्ग झाल्याचं कळवत नाहीत. त्यामुळे आम्ही मेडीकल दुकानदारांना सांगितल आहे की किमान असे कीट विकत घेणाऱ्यांचा मोबाईल नंबर नोंदवून घ्या.”

“आता लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे”

अजित पवार यांनी यावेळी टाटा धरणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “टाटा धरण ब्रिटिशांच्या काळात तयार झालं आहे. ते वीजनिर्मितीसाठी तयार करण्यात आले होते, पण आता परिस्थिती बदलली आहे. आता लोकसंख्या वाढली आहे. आता लोकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे. वीज तयार करण्यासाठी आता अनेक पर्याय आहेत. पाण्यावरच वीज बनवायला हवी असे नाही. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी मिळावे अशी मागणी आहे.”

“टाटा धरणातील पाणी पिण्यासाठी घेणार”

“टाटा धरणातील पाणी पिण्यासाठी मिळावं यासाठी जलसंपदा विभागाला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आल आहे. तो अहवाल कॅबिनेट समोर येईल आणि त्यानंतर यावर निर्णय होईल,” अशीही माहिती अजित पवार यांनी दिली.

“पुणे जिल्ह्यात विमानतळ होणार म्हणजे होणार”

अजित पवार म्हणाले, “पुणे जिल्ह्यात विमानतळ होणार म्हणजे होणार, पण ते कोठे होणार हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कारण त्याला फाटे फुटतात. पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा या सगळ्या जिल्ह्यांना या विमानतळाचा फायदा होईल. या विमानतळासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”

हेही वाचा : राज्यात आज ४२,४६२ नवे करोना रुग्ण, ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येतही वाढ, वाचा कोठे किती रूग्ण?

“दहावी-बारावीच्या परिक्षा ऑफलाईन व्हायला हव्यात, मात्र यावरील अंतिम निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेतील. ऑनलाईनमध्ये कोण असतं आणि कोण नाही काही कळत नाही. मागच्या वर्षी आपला निकाल १०० टक्के लागला आहे. माझं वैयक्तिक मत आहे की, परिक्षा ऑफलाईन व्हाव्यात,” असंही मत अजित पवार यांनी मांडलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar inform about 700 youngsters stuck in assam due to corona infection pbs
First published on: 15-01-2022 at 09:42 IST