Ajit Pawar Pune Last Meeting: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यावर पकड; तसेच पुण्यावर विशेष प्रेम होते. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले, तरीही पुण्याच्या विकासाचे त्यांचे ध्येय कायम होते. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यानंतर लगेचच त्यांनी मंत्रालयात खास बैठक घेतली, ती पुण्याच्या विकासकामांसाठी!… ही पुण्यासाठी घेतलेली त्यांची शेवटची बैठक ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत पुण्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले हे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांच्या पुण्यातील शिलेदारांवर येऊन पडली आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रशासनावर पकड असलेल्या अजित पवार यांचे पुण्यावर विशेष प्रेम होते, त्याची प्रचिती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आली. मंगळवारी (२७ जानेवारी) मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय झाल्यानंतर अजित पवार यांनी दुपारी पुण्याच्या विकासकामांचा आढावा आणि विकासकामांसाठी विशेष बैठक घेतली. पुण्याच्या विकासासाठी कायम सहकार्याची भूमिका असलेल्या अजित पवार यांनी पुण्याबाबतीत घेतलेली ही शेवटची बैठक ठरली. या बैठकीत पुण्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, वाहतूककोंडी यावर चर्चा झाली. पुण्याचा विकास थांबता कामा नये, हा त्यांचा ध्यास होता, हे या बैठकीतून दिसून आल्याचे अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’चे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख हे नमूद करतात.
महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी प्रचाराचा झंझावात केला. पाणीपुरवठा, वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, शहरातील रखडलेले प्रकल्प हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवत त्यांनी प्रचाराची राळ उठवली. त्यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे निवडणुकीला रंगत आली. मरगळ आलेल्या दोन्ही ‘राष्ट्रवादीं’च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. त्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला २७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला तीन जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३९ जागा होत्या. प्रचारात मिळालेला प्रतिसाद पाहून जास्त जागा मिळतील, अशी अजित पवार यांना आशा होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे जागा मिळू शकल्या नाहीत.
बारामतीत गेल्या आठवड्यात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘पुणेकरांनी आम्हाला हवा तसा प्रतिसाद दिला नाही’ असे सांगत मनातील ही बोच त्यांनी बोलून दाखवली. मात्र, त्यांच्या मनात कटूता नव्हती. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांनी पुण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मंगळवारी बैठक घेतली. पुण्याच्या विकासासाठी घेतलेली ती त्यांची शेवटची बैठक ठरली.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तयारीला लागले. दरम्यानच्या काळात त्यांनी पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी वेळेत करण्याच्या सूचनाही दिल्या. गटनेतेपदी माजी सभागृह नेते नीलेश निकम यांची निवड करून त्याबाबतचे पत्र त्यांना दिले. राज्याचा कारभार सांभाळत असताना त्यांनी पुण्याचा विकास आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद कायम ठेवला.
महापालिकेच्या प्रचाराच्या काळात पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी मेट्रो आणि बससेवा मोफत देण्याची केलेली घोषणा चर्चेत राहिली. पुणेकरांना मेट्रो आणि बससेवा मोफत दिल्यावर त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपीएमएलला येणारा खर्च महापालिकेकडून देण्याच्या या योजनेला पुणेकर पसंती देतील, अशी त्यांना खात्री होती. त्यावरून अन्य पक्षांनी टीका केली, तरीही अजित पवार हे ही योजना राबवता येईल, याबाबत ठाम होते. त्यांच्या अकाली निधनाने पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बससेवा देण्याचे स्वप्न भंग पावले आहे.
अजित पवार यांचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहराकडेही लक्ष असायचे. आधुनिक पुण्याच्या जडणघडणीचे तेदेखील एक शिल्पकार होते. पुण्याच्या हितासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. ही गोष्ट त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली. अजित पवार यांचा विकासाचा हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्या पुण्यातील शिलेदारांवर आली आहे. त्यांच्याबरोबर काम करणारे नेते आणि कार्यकर्त्यांना आता अधिक जोमाने मैदानात उतरावे लागणार आहे. विकासकामातील शिस्त आणि ध्यास याचा वारसा पुढे न्यावा लागणार आहे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल!
sujit.tambade@expressindia.com

