पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तहसीलमध्ये मालेगाव नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणात म्हणाले, तुम्ही मला १८ च्या १८ उमेदवार निवडून द्या, मी तुमची म्हणेल ती कामे करून देईल, तुम्ही जर तिथ काट मारली, तर मी देखील काट मारणार, तुमच्या हातामध्ये मत द्यायच आहे. तर माझ्या हातामध्ये निधी द्यायच आहे. त्यामुळे बघा काय करायच, असे विधान अजित पवार यांनी केले होते.
अजित पवार यांच्या विधानावर विरोधक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत असून दरम्यान अजित पवार हे पुणे दौर्यावर आले होते. पुणे स्टेशन येथील शासकीय विश्रामगृह येथे पुणे शहर, पिंपरी चिंचवड येथील पदाधिकाऱ्याची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्या बैठकीनंतर माळेगाव येथील विधाना बाबत अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, बिहारच्या निवडणुकांमध्ये राजदचे तेजस्वी यादव यांनी आम्हाला निवडून दिल्यास, आम्ही निधी जास्तीत जास्त देऊ असे विधान केले होते. त्यामुळे निवडणुकांमध्ये असे आश्वासन द्यावे लागते असे म्हणत त्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले.
