पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच आरक्षण सोडत जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. आज शुक्रवारपासून इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण साेडत झाली आहे. प्रभागातील आरक्षणामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांकडून जाेरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाने ३२ प्रभागांतील इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुकांनी खराळवाडीतील पक्ष कार्यालयात २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत.
अर्जासोबत इच्छुकांनी आपली माहिती देताना अर्जदाराचे संपूर्ण नाव, विधानसभा मतदारसंघाचे नाव, प्रभागाचे नाव, प्रभाग क्रमांक, मतदारयादीतील भाग व अनुक्रमांक, आरक्षण प्रवर्ग, जातवैधता प्रमाणपत्र, छायांकित प्रत, जन्मदिनांक, वय, शिक्षण, आधार कार्ड, पक्षाचा क्रियाशील व प्राथमिक सदस्य क्रमांक आदींसह कार्य अहवाल जोडणे आवश्यक असल्याचे शहराध्यक्ष बहल यांनी स्पष्ट केले आहे.
‘राष्ट्रवादी’ एकत्र येण्याबाबत दोन दिवसांत निर्णय पिंपरी-चिंचवड शहर एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते. सलग १५ वर्षे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. परंतु,२०१७ मध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावला. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सहभागी झाली. मात्र, भाजपने पिंपरी -चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांनीही स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही शहरात ताकद नगण्य आहे. पक्षासोबत केवळ दोन माजी नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षात आलेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे पुन्हा समर्थक नगरसेवकांसह अजित पवारांसोबत गेले आहेत.
चिंचवडमधून लढलेले राहुल कलाटे हे तटस्थ असून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चाचपणी करत आहेत. याबाबत अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
