पुणे : ‘शहराचा विस्तार चारही दिशांना होत असून लोकसंख्येतही वाढ होत आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात दोन नवीन महापालिका होऊ शकतात. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यास दोन महापालिका केल्या जातील,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका झाल्या असून त्या तुलनेत पुणे जिल्ह्यात दोन नवीन महापालिकांची आवश्यकता असल्याचेही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पवार म्हणाले, ‘शहराचा विस्तार वाढत आहे. हडपसरच्या पुढील भागांचा समावेश करून एक महापालिका आणि चाकण, आळंदी, वाघोली या परिसरासाठी आणखी एक महापालिका अशा दोन महापालिका करणे आवश्यक आहे. महापालिकेत सत्ता आल्यास त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. महापालिकेच्या हद्दीतून वगळून उरुळी, फुरसुंगी या दोन गावांसाठी नगरपरिषद करण्यात आली. राज्य सरकारने हा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे तेथील नागरिक समाधानी आहेत, असे वाटत नाही. महापालिका करण्याचे ठरल्यास ही दोन गावे देखील महापालिकेत येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमधील कारभारी; तसेच प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘अलार्म’ मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
‘अलार्म‘ मोहिमेचे गीत
महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी ‘अलार्म’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ‘एक अलार्म, पाच काम’ ही या योजनेची संकल्पना आहे. त्यामध्ये पाच नागरी समस्यांबाबत नागरिकांमध्ये जागृती केली आहे. त्यावर आधारित गीत तयार करण्यात आले असून, त्याचे अनावरण बुधवारी करण्यात आले. हे गीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रचार काळात मतदारांना ऐकवले जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
‘एक अलार्म, पाच काम’
- पाणी: २४ बाय ७ स्वच्छ पाणी पुरवठ्याची हमी
- रस्ते आणि वाहतूक : खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्ते
- स्वच्छता : वेळेवर कचरा संकलन आणि संपूर्ण स्वच्छता
- सार्वजनिक जागा आणि प्रदूषण निर्मूलन : सर्व वयोगटातील लोकांसाठी राखीव क्रीडांगणे आणि विरंगुळा पार्क आणि प्रदूषण नियंत्रण.
- आरोग्य: प्रत्येक प्रभागात सुसज्ज, सुलभ आरोग्य सुविधा
आरोप-प्रत्यारोपांबाबत अजित पवारांचे मौन
महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत उत्तर दिल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवारी एक पाऊल मागे घेतले. ते म्हणाले, ‘भाजपच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देणार नाही. विकासाच्या प्रश्नावर बोलणार आहे.’
भाजपवर केलेल्या टीकेमुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले असून राज्यातील युती तोडणार असल्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिला आहे, याबाबत विचारण्यात आले असता, पवार म्हणाले, ‘या विषयावर मी काहीही बोलणार नाही. राज्यातील युती तुटते का राहते, याचा निर्णय १६ जानेवारीच्या निकालानंतर होईल. तोपर्यंत जरा कळ काढा,’.
