शाळांमध्ये सरस्वती देवीच्या प्रतिमेऐवजी महापुरूषांची छायाचित्रे लावावीत, हे छगन भुजबळ यांचे वैयक्तिक मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तसे मत नाही. पण प्रत्येकाला त्याच्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना शुक्रवारी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी हे विधान केले होते. त्यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना ही भूमिका मांडली.

हेही वाचा- “असल्या फालतू…”, अजित पवारांचं अब्दुल सत्तारांवर टीकास्र; ‘त्या’ विधानावरून सुनावलं!

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षणासाठी जाणार

काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूरसह सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावरून फडणवीस एकट्याने इतक्या जिल्ह्यांचा कारभार कसा पाहणार, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी अजित पवार यांना पुण्यात आल्यावर प्रत्युत्तर दिले होते. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर, एकावेळी अनेक जिल्ह्यांचा कारभार कसा पाहायचा, याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना देईन, असा चिमटा फडणवीस यांनी काढला होता.

देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विचारणार आहे की, मी तुमच्याकडे ट्रेनिंगला कधी येऊ, त्यासाठी किती फी लागेल? फडणवीस मला हे ट्रेनिंग विनामूल्य देणार आहेत? त्यांच्याकडे जाऊन मी माझ्या ज्ञानात भर घालतो, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.

हेही वाचा- ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…”

दरम्यान, पीएफआय संघटनेवरील कारवाई, शेतकऱ्यांना देण्यात आलेली आर्थिक मदत, दसरा मेळावा अशा विविध मुद्द्यांवर अजित पवार यांनी भाष्य केले. पुण्यात पीएफआय संघटनेकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले की नाहीत, याचा तपास पोलीस अजून करत आहेत. याविषयी दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

सन २०१४ मध्ये एकनाथ शिंदे अशोक चव्हाणांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन आले होते, या चर्चेविषयी बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला. हे सगळे २०१४ मध्ये घडले आहे, आता आपण २०२२ मध्ये आहोत. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्यात अर्थ नाही. जनतेला या सगळ्या वादांमध्ये रस नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.