Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026: ‘पिंपरी-चिंचवड शहरातील पाचशे चौरस फुटाच्या घरांना मालमत्ताकर माफी, विकास आराखडा (डीपी) रद्द करणे आणि दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे हमीपत्र रविवारी प्रसिद्ध करण्यात आले. पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही पीएमपी, मेट्रोचा प्रवास विनामूल्य केला जाईल. याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका सभेला असून राज्य मंत्रिमंडळाची मान्यता लागत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हमीपत्रात विविध आश्वासने दिली आहेत. नळाद्वारे रोज पाणी, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी, टँकरमुक्त, खड्डेमुक्त, वाहतूक कोंडी, प्रदूषण मुक्त शहर, स्वच्छता अभियानात भारतात प्रथम स्थान, अत्याधुनिक आरोग्य सुविधा, मॉडेल स्कूल, विद्यार्थ्यांना मोफत टॅब, रस्त्यांचे जाळे वाढविण्याची हमी पवार यांनी दिली. सत्ता येताच या सर्व आश्वासनांची मी पूर्तता करणार हा अजितदादाचा वादा आहे. हे हमीपत्र कागदावर राहणार नसून शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. जागतिक दर्जाचे शहर केले जाईल, असेही ते म्हणाले.

काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हमीपत्रात?

नळाद्वारेरोज पाणी

सर्व प्रभागांतून नळामधून उच्च दाबाने दररोज पाणीपुरवठा केल जाईल. यामुळे उंच भागत राहणाऱ्या नागरीकांना पुरेसे पाणी मिळेल आणि टँकरपासून कायमची मुक्तता मिळेल. पाणीपुरवठा अवेळी असल्याने नागरिक त्रस्त आहेत, त्यावर तोडगा म्हणून निश्चित वेळापत्रक तीन महिने अगोदर जाहीर केले जाणार आहे.

टँकरमाफियांचे १०० टक्के उच्चाटन

शहरातील ५००० हाऊसिंग सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांना लाखो रुपये खर्च करून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. या टँकर माफियांचे १०० टक्के उच्चाटन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात एक सामुदायिक विहीर उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून दीर्घकालीन शाश्वत कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाणी गळती दुरुस्तीसाठी १० मोबाईल सेन्सर व्हॅन्स सज्ज ठेवल्या जातील.

५०० चौरस फुटाच्या घरांची मालमत्ता करातून सुटका –

निवडणूक होताच १ एप्रिल २०२६ पासून सर्व मध्यमवर्गीयांच्या मालकीच्या ५०० चौरस फुटापर्यंत्या घरांचा मिळकतकर माफ केला जाईल. लहान घरमालक, जेष्ठ नागरीक आणि मध्यवर्गीय कुटुंबांना थेट याचा लाभ मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट

विद्यार्थयांना डेटा प्लानसह मोफत टॅबलोट मिळणार आहे ज्यामुळे शिक्षण कोणत्याही खर्चाशिवाय किंवा कनेक्टिव्हीटीच्या अडथळ्याशिवाय सुरू राहणार आहे.

पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

रोजगाराभिमुख कोशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाडक्या बहिणींनासाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी किंवा विस्तारासाठी पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

डीपी रद्द करणार

शहरात सर्वात वादग्रस्त ठरलेला सुधारीत शहर विकास आराखडा रद्द करण्याचे ठोस आश्वासन अजित पवार यांनी हमीपत्रात दिले आहे.