पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ‘ब्लॅक बॉक्स’ (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) विमान अपघात तपासणी ब्यूरोच्या (एएआयबी) पथकाने ताब्यात घेतला आहे. हा बाॅक्स सुरक्षित असून, यातील माहिती मिळविण्यासाठी सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी लागेल, असा अंदाज नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सकाळी खासगी विमानाने बारामतीकडे निघाले होते. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ८.१० वाजता विमानाचे उड्डाण होऊन ८.४० दरम्यान ते बारामती येथे पाेहोचले. सकाळी धुक्याच्या अडचणींमुळे धावपट्टीचा अंदाज येत नसल्याने वैमानिकाने एक घिरटी (गो अराउंड) घेतली. तसेच, हवाई दलाच्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) कक्षाला संपर्क साधला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत म्हणजे ८.४३ वाजता अपघात झाला. मदतीपूर्वीच विमानाचा स्फोट झाल्याचे समोर आल्याचे स्पष्टीकरण ‘डीजीसीआय’ कडून देण्यात आले.
‘एएआयबी’आणि ‘डीजीसीए’मधील प्रत्येकी तीन अधिकाऱ्यांचे पथक अपघातस्थळी बुधवारी पोहोचले. तसेच, ‘एएआयबी’चे महासंचालक जी. व्ही. जी. युगंधर देखील त्याच दिवशी घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमानंतर विमानाचे अवशेष, महत्त्वाचे तुकडे आणि ब्लॅक बाॅक्स सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आला.
ब्लॅक बॉक्समधून विमानाच्या अंतिम क्षणांबाबत महत्त्वाची माहिती मिळवण्यात येत आहे. ही तांत्रिक माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याची सखोल तपासणी करण्यात येईल, त्यानंतर अपघाताचे कारण समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भविष्यात असे अपघात घडू नयेत म्हणून सुरक्षित मानकांबाबत तरतुदी आणि उपाययोजनांंची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी उड्डाण वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिले.
एएआयबी नियम, २०२५ च्या नियम ५ आणि ११ नुसार हा तपास सुरू करण्यात आला आहे. तपासणीध्ये अपघाताचे कारण, मानवी चुका, तांत्रिक बिघाड, वातावरण, ‘मेकॅनिकल फेल्युअर’, पक्षाची धडक आदींबाबत आलेल्या अडचणींची माहिती स्पष्ट होणार आहे. प्रवासादरम्यान, वैमानिक आणि एटीसी यांच्यासोबत झालेला संवाद याची दोन तासांपर्यंतचे संवादाचे रेकाॅर्डींग तांत्रिक भाषेत (कोडींग) असते, ती समजणाऱ्या भाषेत (डीकोडींग) उलगडण्या येईल. यातून अपघाताचे मुख्य कारण समोर येईल. यासाठी साधारणतः तीन आठवड्या्ंचा कालावधी लागण्याची शक्यताही पथकातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

