बारामती : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनतेची ईच्छा आहे. त्यानुसार लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी मांडली. तर, सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे. सुनेत्रा वहिनींच्या मंत्रिमंडळ सहभागासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार असल्याचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ, नवाब मलिक यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले.

झिरवाळ म्हणाले, ‘सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळावी. त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे. हीच अजित दादांना खरी श्रद्धांजली असेल. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहे,’ ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, ही संपूर्ण महाराष्ट्राची मागणी होती. आता ही मागणी आणखी जोरकसपणे होईल. कारण, असे विखुरलेले राहून चालणार नाही. एकत्रच राहावे लागणार आहे, हे आपले विचार आहेत. तसेच सर्वसामान्यांचेही हेच विचार आहेत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत नवाब मलिक यांनीही भाष्य केले. ते म्हणाले,‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत कल्पना नाही. मात्र, ही जनतेची ईच्छा आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.’

दरम्यान, पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात येत होती. या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले होते. तर, दोन्ही पक्षांचे नेते एकत्र प्रचार सभा घेत होते. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादीतील फूट गळून पडेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत होती. मात्र, बुधवारी सकाळी बारामती येथे विमान कोसळून अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे काय होणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत होता. अजित दादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, पक्षाची धुरा कोणाच्या हाती येणार, याची जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध खात्यांचे मंत्री, राज्यमंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, खासदार, आमदार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली.