पुणे : सत्ताबदल झाला की पालकमंत्री बदलतात. आजवर पुणे जिल्ह्यासाठी विविध पक्षांचे पालकमंत्री होऊन गेले; पण पुण्याचे पालकमंत्री कोण, असा प्रश्न केल्यास हमखास नाव येते ते अजित पवार यांचे! पालकमंत्री आणि अजित पवार हे एक समीकरणच झाले होते. त्या अर्थाने अजित पवार हे पुण्याचे तहहयात ‘पालक’ राहिले.

पालकमंत्री हा त्याच जिल्ह्यातील असेल, तर तो जिल्ह्याचा नेता मानला जातो. पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असल्याने या समितीच्या निधीच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळणारा कोट्यवधी रुपयांचा निधी हा कोणत्या कामासाठी खर्च करायचा, हे पालकमंत्री ठरवत असतात. त्यामुळे पालकमंत्री पदाला गेल्या काही वर्षांत महत्त्व आले.

पुणे जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडे पालकमंत्री पद राहिले. १९८० च्या काळात दिवंगत खासदार रामकृष्ण मोरे आणि १९९० च्या काळात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी हे पद भूषविले. १९९५ मध्ये तत्कालीन भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या पदाची जबाबदारी होती. १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकत्व आले आणि त्यानंतर हे पद त्यांच्याकडे येत राहिले.

अजित पवार हे १९९९ मध्ये पहिल्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर २००३ पर्यंत त्यांच्याकडे हे पद होते. या काळात त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी विकासकामांसाठी निधी देऊन कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. त्यानंतर वर्षभरासाठी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे हे पद होते. मात्र, त्यानंतर २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना अजित पवार हेच सलग दहा वर्षे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या काळात त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड आणखी मजबूत केली. जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायती, पंचायत समित्या या ठिकाणी अजित पवार यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना पाठबळ दिले. त्यामध्ये तरुणांची संख्या जास्त होती. त्यांनी विश्वासू साथीदारांची फळी तयार केली. पालकमंत्री हे पद किती महत्त्वाचे असते, हे अजित पवार यांनी दाखवून दिले. पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच पालकमंत्री पदाच्या काळात त्यांनी राजकीय ताकद वाढवली.

सत्ताबदल आणि पदबदल

राज्यात २०१४ मध्ये सत्ताबदल होऊन भाजपची सत्ता आली. त्या वेळी दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अजित पवार हे पालकमंत्री पदापासून दूर झाले. २०१४ ते २०१९ पर्यंत दिवंगत खासदार गिरीश बापट हे पालकमंत्री होते. त्या वेळी बापट आणि अजित पवार यांच्यात मैत्रीचे संबंध कायम राहिले. २०१९ मध्ये भाजपने पालकमंत्री पदात बदल करून चंद्रकांत पाटील यांच्याकडे या पदाची जबाबदारी दिली. राज्यात पुन्हा सत्ताबदल झाला. अजित पवार हे भाजपबरोबर सामील झाले आणि पालकमंत्री पद कोणाला द्यायचे, याबाबत भाजपपुढे प्रश्न निर्माण झाला. चंद्रकांत पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवार हेदेखील सत्तेत सहभागी असल्याने त्यांनीही पदावर दावा केला. त्या वेळी अजित पवार यांनी राजकीय कसब पणाला लावले आणि त्यांना पुन्हा पालकमंत्री पद देण्यात आले. तेव्हापासून तेच या पदावर कायम राहिले. त्यामुळे अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे तहहयात ‘पालक’ राहिले.