पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या राजवटीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपवरील आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले कोणतेही बोलणे झाले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेल्या माजी नगरसेवकांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थतता असल्याचा दावाही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अनौपचारिक गप्पा मारल्या. अजित पवार म्हणाले, महापालिकेत नऊ वर्षात विचित्र कारभार झाला आहे. चुकीच्या कमासासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. यांचे लोक उभे राहून अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करायला लावतात. त्यामुळे अधिकारी घाबरले आहेत. अधिकारी स्वच्छतानिवृत्तीचा मार्ग अवलंबत आहे. शहर अभियंत्यांनी स्वच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आहे. यांनी असा काय व्यवसाय केला की हजारो कोटींचे मालक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या माजी नगरसेवकांनी आर्थिक अडचण असल्याचे सांगितले. आम्ही कामे देतो, असे आमिष दाखवून त्यांना भाजपने पक्षात घेतले. सुपारी बाजांना मी महत्व देत नाही. एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो.
स्थानिक पदाधिकारी विरोध करण्यास कमी पडले
महापालिकेतील भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठविण्यास, विरोध करण्यास स्थानिक पदाधिकारी कमी पडले, हे मला मान्य आहे. नेता एकटाच असतो. ठरावीक लोक कामे करतात. बाकीचे पाठिशी उभे राहतात. माझ्याकडे बघून नगरसेवकांना निवडून द्यावे, असे जनतेला माझे आवाहन आहे. मी दर आठवड्याला शहरात येऊन काम करेल, असेही अजित पवार म्हणाले.
पाणी वितरणात ‘एआय’चा वापर
पूर्वी गाववाले आणि बाहेरचा असा मुद्दा आणला जात होता. आता परिस्थिती बदलली आहे. बाहेरची लोकसंख्या वाढली आहे. माझा गृह जिल्हा पुणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास टँकर माफिया गँग बंद केली जाईल. दररोज पाणीपुरवठा केला जाईल. पाणी वितरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयचा) वापर करणार करण्यात येणार आहे. माझ्याकडील पुराव्यांच्या आधारे महापालिकेतील चुकीच्या कामांची चौकशी करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता येईल
लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकाच पक्षाचे बहुमत येईल. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता येईल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले. सूर जुळले तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असेही त्यांनी सांगितले. मुलगा पार्थ आणि जय पवार महापालिका निवडणुकीच्या प्रचारात दिसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपमध्ये अस्वस्थतता
राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेल्या माजी नगरसेवकांनाच भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमधील निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्यामध्ये अस्वस्थता असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दृष्टी (व्हिजन) नसलेल्या व्यक्तीच्या हातात शहर गेले आहे. लक्ष्मण जगताप होते, तोपर्यंत ठीक होते. दोघे मिळून कारभार करत होते. आमदार शंकर जगताप ज्युनिअर पडत आहेत. विधानपरिषदेच्या आमदारांना किती अधिकार आहेत हे सर्वांना माहिती आहे, असेही अजित पवार म्हणाले.
अजित नाव आल्याने कोरेगाव प्रकरण उचलले
पार्थ याच्या पुढे अजित पवार नाव होते. त्यामुळे कोरेगाव (मुंढवा) जमीन प्रकरण उचलण्यात आले. परंतु, त्याचे खरेदी खत होऊच शकत नाही.
त्याची चौकशी सुरू आहे. दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच होईल, असेही अजित पवार म्हणाले.
