सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार ) नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितलं जात आहे. सुनेत्रा पवार यांच्यामुळे राज्यसभेत जाण्याचीही त्यांची संधी हुकली, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याबाबत अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहे. दरम्यान, आता यासंदर्भात अजित पवार यांनाही प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांबाबतही विचारण्यात आलं आहे. यासंदर्भात बोलताना, छगन भुजबळ हे नाराज नसून माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “छगन भुजबळांना नेमकं काय हवंय ते देऊन टाका”, शिंदे गटातील नेत्याची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीचं वातावरण…”

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“छगन भुजबळ नाराज आहेत, हे पूर्णपणे खोटं आहे. ते नाराज नाहीत, असं त्यांनी काल सांगितलं आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे की कोणीही नाराज नाही. मात्र, विरोधक आणि आमच्या जवळच्या मित्रांनी या बातम्या पेरल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले. तसेच राज्यसभेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला असून तो अर्जदेखील मंजूर झाला आहे. आता उमेदवाराने (सुनेत्रा पवार) माघार घेतली नाही. तर ते बिनविरोध खासदार होती”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

अर्ज भरताना घटक पक्षांचे नेते का नाही? अजित पवार म्हणाले..

पुढे बोलताना, सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना महायुतीतील घटक पक्ष का उपस्थित नव्हते, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “ज्यावेळी दिवशी आम्ही उमेवदारी अर्ज दाखल केला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस नाशिक मध्ये होते, अमोल काळे यांच्या निधनामुळे ते दु:खी होते. त्यामुळे मी त्यांना कसं बोलणार? अशावेळी त्यांना बोलवणं मला योग्य वाटलं नाही. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याशीदेखील माझं बोलणं झालं होतं”. असं अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा – संघाच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीचा उल्लेख करत भाजपावर टीका; अजित पवार म्हणाले, “मला फक्त…”

नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळांची स्पष्टीकरण

दरम्यान, नाराजीच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना, आपण उमेदवारीमुळे नाराज नसल्याचं भुजबळांनी यावेळी सांगितलं. होतं. “माझ्या तोंडावर नाराजी दिसतेय का? काय संबंध? मी अजिबात नाराज नाहीये. पक्षात सगळ्यांना सोबत घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात. हे मी ५७ वर्षांपासून शिकतोय. शिवसेनेत असताना, शरद पवारांसोबत असताना, काँग्रेसमध्ये असतानाही सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात हे शिकलो. त्याप्रमाणे ते घेतले आहेत. सगळं तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले होते.