पुणे प्रतिनिधी: शिरुर, भिवंडी आणि जालना या तीन लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय येथे सुरुवात झाली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हे हे भाजपात जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे नव्या कार्यकर्त्याला शिरुरमधून संधी दिली जाईल अशी चर्चा होती. पण आज अमोल कोल्हे यांनी बैठकीला हजेरी लावली.
त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला असता शिरुर लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरवणार का? प्रश्न विचारताच ते म्हणाले की, “तुम्ही काही काळजी करू नका. अतिशय व्यवस्थितपणे शरद पवार, जयंत पाटील, मी, दिलीप वळसे पाटील, अमोल कोल्हे आम्ही सर्व बसून योग्य मार्ग काढू.” यावेळी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्या बाजूला उपस्थित होते. त्या विधानावर अमोल कोल्हे यांनी हसून दाद दिली.




आणखी वाचा-“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी…” नाना पटोले यांची टीका, म्हणाले…
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती : अजित पवार
भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहोत, संस्कार झाले असतील, त्यानुसार ते बोलणार. पण वास्तविक सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती.” अशी भूमिका मांडत अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना सुनावले.