पुणे : ‘अजितदादा. भल्या पहाटे उठून विकासकामांची पाहणी करायची. एखादे काम हाती घेतले की, ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटायचे नाही अन् कितीही जवळचा असो काम होणार नसेल, तर जागेवरच स्पष्टपणे सांगायचे. बोले तैसा चाले, अशी प्रतिमा. अजितदादा आमच्यातून गेलेत, यावर विश्वासाच बसत नाही. अजून बरेच काम बाकी आहे, रस्ते पूर्ण व्हायचेत.’ दादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देव पाण्यात ठेवणाऱ्या बारामतीकरांचा उर दाटून आला होता. ज्याच्या जीवावर न्यायासाठी लढण्याची, कुणालाही भिडण्याची हिंमत व्हायची, जीव ओवाळून टाकावा असा अखंड काम करणारा नेता नव्हे कुटुंबप्रमुख गमावल्याची भावना बारामतीकरांनी व्यक्त केली.
बुधवारी सकाळी विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे निधन झाले. दादांच्या निधनाची बातमी येताच बारामती तालुक्यावर शोककळा पसरली. दादांच्या निधनाची बातमी मिळतात हातातले कामं जिथल्या तिथे ठेवून असंख्य बारामतीकर घराबाहेर पडले. सुरुवातीला कोणालाही विश्वास बसला नाही. स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करण्यासाठी म्हणून गावागावातून शेकडो लोक बारामतीकडे रवाना झाले. घराघरातून आक्रोश नोंदवला गेला. दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आल्या. कुठेही बळजबरी करण्यात आली नाही, दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले नाही. ‘दादा असे कसे गेले. नेमके काय झाले. घरातला कर्ता पुरुष गेला. आता काय करायचे, कोणाकडे जायचे… या अन् अशा अनेक सवालांनी बारामतीकर हैराण झाले होते. एरवी राजकारणात विरोधक असलेले तालुक्यातले नेतेही दादांच्या अशा जाण्याने पोरके झाल्याची भावना व्यक्त करत होते.
‘दादांनी जे केलं ते मनापासून केलं. मग तो विरोध असो की, प्रेम. एकदा का दादांचा हात पाठीवर पडला की, सगळ्या अडचणी, सगळे धोके अन् सगळ्या जबाबदाऱ्या हलक्या होतात. आणि एकदा का दादांनी ठरवले, की भले-भले मातब्बर म्हणवणारे सहजच गारद होतात,’ दादांबद्दल बोलताना एका तरुण कार्यकर्त्याचा उर भरून आला. तर, ‘साहेबांनंतर बारामती कुणाची, तर, बारामती फक्त अजित दादाचीच. साहेबांच्या बारामतीला अजितदादांनी पोटच्या लेकरासारखं वाढवलं. तालुक्याचा कायापालट केला.
कुणीही तोंडात बोट घालावी, अशी काम करून दाखवली. तरीही, दादांच्या बोलण्यात माज नव्हता. अभिमान होता आणि निव्वळ प्रेम. नंदनच्या दूध संघापासून ते संसद, विधानसभेच्या बाकांपर्यंत… अजित दादांचा तोच थाट होता. माळेगाव असो की सोमेश्वर, दादा म्हणजे रुबाब. एवढं सगळं असलं, तरी दादा हळवा होता. लहानग्यांचं कौतुक मिरवणारा अन् म्हातारीच्या दुखण्याने व्याकुळ होणारा अजितदादा, खरा दादाच होता. त्यांनी साहेबांना सोडलं म्हणतात, पण असं कधी वाटलंच नाही. दादा साहेबांच्या बारामतीसोबतच होते. दादा गेले, बारामती पोरकी झाली. पुढे कसं होईल,’ अशी चिंता व्यक्त करताना सुप्यावरून आलेले ज्येष्ठ नागरिक व्याकूळ झाले.
साहेबांप्रमाणेच दादांनी बारामती जपली, जोपासली म्हणून साहेबांप्रमाणेच दादांवरही बारामतीकरांनी प्रेम केले. निवडणुकीत भरभरून मते दिली. दादांची साथ सोडली नाही. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर होत्या. नेहमीप्रमाणे दादांनी प्रचाराची सुरुवात दणक्यात केली. राष्ट्रवादीत पडलेली फुट या निवडणुकीत गळून पडली होती. साहेब, दादा, सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी या सर्वांचे फोटो प्रत्येक पोस्टरवरती झळकत होते. बालेकिल्लातील निवडणूकही हलक्यात न घेणाऱ्या दादांची या निवडणुकीत मात्र वेळ चुकली.
काळाने घाव घातला. दादा गेले. मात्र, बारामतीतले चकचकीत रस्ते, इमारती आणि विकसित देशांमधल्या शहरांनाही आदर्श ठरतील अशा पायाभूत सुविधा, बारामती शहराच्या प्रत्येक वास्तुत दादा जिवंत आहेत. इथल्या प्रत्येक माणसाच्या काळजात दादांनी घर केले. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या सावलीतही दादांसारखा दिलदार माणूसच वेगळा ठसा उमटवू शकतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असो की, वेगवेगळ्या कंपन्यांची दालने, विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरू असलेले जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम आणि शांत, रम्य असा लौकिक असलेली बारामती दादांनी उभी केली. नुसते रस्ते बांधले, इमारती उभे केले म्हणजे विकास होतो का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. मात्र, सूर्याच्या स्नेहाने सुंदर झालेल्या सायंकाळी तलावाच्या काठाने मन हलके करून बसणाऱ्या बारामतीकर म्हणजे दादांच्या दूरदृष्टीची साक्षच.
आता दादानंतर कोण ?, हा सवाल उपस्थित केला जात असला, तरीही काटेवाडी, शिर्सुफळ, सुपे, कऱ्हावागज, निरावागज, माळेगाव, पणदरे, कोऱ्हाळे, वडगाव, मोरगाव, शेटफळ, कटफळ अशा बारामती तालुक्यातल्या प्रत्येक गावातून ‘एकच वादा, अजित दादा,’चा जोमाने देण्यात येत आहे. ‘अमर रहे, अमर रहे, अजितदादा अमर रहे,’च्या घोषणा अन् ‘दादा परत या’चा आक्रोश बारामतीकरांना बसलेला धक्का मोठा आहे, हे सांगायला पुरेसा. त्यामुळे ‘इतक्यात कोणतेही समीकरण नको, नि राजकारण नको. आमचं घर उजाड झालं आहे. आता एकदा दादाला डोळे भरून पहायचं आहे. दादाने केलेल्या आभाळभर कामांसाठी त्याला प्रेम द्यायचे आहे. मनभरून रडायचे आहे. दिलखुलास, दिलदार दादाला शेवटचा निरोप द्यायचा आहे,’ अशा प्रतिक्रियांनी बारामतीचे वातावरण भावनिक झाले आहे.
